बॉलिवूड अभिनेता सनी देओलने भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर आता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तो उतरणार आहे. सनी देओलला पंजाबमधील गुरुदासपूर मतदार संघातून भाजपाने उमेदवारी दिली आहे. सनी देओलने नुकताच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सनीने आपला उमेदवारी अर्ज भरताना पगडी परिधान केली होती. तसेच, त्याने अजय सिंह देओल या त्याच्या खऱ्या नावाने अर्ज दाखल केला.
सनी देओलचा भाऊ आणि अभिनेता बॉबी देओल हा देखील त्याच्यासोबत उपस्थित होता. या अर्जसोबतच सनीने आपल्या संपत्ती आणि शिक्षणाबद्दल देखील माहिती दिली. गुरुदासपूर मतदार संघातून अभिनेता विनोद खन्ना यांच्या निधनानंतर अभिनेता सनी देओलला लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले आहे. सनी देओलसमोर काँग्रेसचे उमेदवार सुनील जाखड यांचे आव्हान असून ते विद्यमान खासदार आहेत.
सनी देओल आठ दिवसांपूर्वी गुरूदासपूरला दाखल झाला. तो आता तिथे प्रचार करणार असून बॉबी देओल देखील त्याच्यासोबतच निवडणुकीपर्यंत तिथे राहाणार आहे. गुरूदासपुर येथे मतदान 19 मे ला होणार आहे. सनी आणि बॉबी चार्टेड प्लेनने अमृतसरला आले. त्यांना यावेळी कॅमेऱ्यात टिपण्यात आले. त्यावेळी सनी देओलने आणलेले सामान पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण सनीने मुंबईहून 12 पेक्षा देखील अधिक बॅगा आणल्या आहेत. या बँगामध्ये कपड्यांसोबतच एक्सरसाईजचे देखील सामान आहे. यावरूनच सनी त्याच्या फिटनेसच्या बाबतीत किती सतर्क आहे हे लगेचच लक्षात येत आहे.
सनी देओल यांचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे भाजपाशी जोडले गेलेले आहेत. 2004 मध्ये भाजपाच्या तिकिटावर त्यांनी राजस्थानच्या बिकानेरमधून निवडणूक लढवली होती. त्यांनी खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर स्वत:ला राजकारणापासून वेगळे केले होते; परंतु ते मागील काही दिवसांपासून मथुरेत पत्नी हेमामालिनी यांच्यासाठी निवडणूक प्रचार करत होते, ते पाहता राजकारणाबाबत त्यांचे मन बदलत आहे की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.