22 वर्षांआधी एका ट्रेनची चेन खेचणे अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांना महागात पडले आहे. होय, अपलिंक एक्सप्रेसची चेन खेचल्याप्रकरणी सनी देओल व करिश्मा कपूर यांच्याविरोधात जयपूरच्या रेल्वे न्यायालयाने आरोप निश्चित केले आहेत.आता हे काय प्रकरण आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेलच. तर हे प्रकरण आहे, २२ वर्षांआधीचे. होय, 1997 मध्ये एका सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यानची ही घटना. जयपूरनजिकच्या फुलेरा रेल्वे स्थानकावर या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. या चित्रीकरणादरम्यान सनी आणि करिश्मा यांनी ट्रेनची चेन खेचली होती. यामुळे ट्रेन निश्चित वेळेपेक्षा 25 मिनिटे उशीराने पोहोचली होती.
याप्रकरणी सनी, करिश्मा यांच्याविरोधात स्टेशन मास्तरांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्वांनी विनापरवानगी ट्रेनवर कब्जा केला आणि येथे 5 ते 10 हजारांच्या संख्येत लोकांना ट्रेनमध्ये बसवून शूटींग केले, असे या आरोपात म्हटले होते. यादरम्यान रेल्वेचीच नाही तर जीविताचीही हानी होऊ शकली असती, असेही आरोपांत म्हटले गेले होते. पोलिसांनी चौकशीदरम्यान सर्वांना क्लिनचीट दिली होती. मात्र कोर्टाने स्वत: दखल घेत, याप्रकरणी सर्वांना नोटीस जारी केले होते.