आज 'पुष्पा 2' सगळीकडे रिलीज झालाय. 'पुष्पा 2' ची क्रेझ इतकी आहे की, काल रात्रीपासूनच मुंबईत आणि भारतातील इतर भागांत 'पुष्पा 2'चे रात्री उशीरा शो सुरु झालेत. अशातच 'पुष्पा 2' पाहायला गेलेल्या प्रेक्षकांना एक खास सरप्राइज मिळालंय. ते म्हणजे 'पुष्पा 2'सोबत सनी देओलच्या जाट (JATT) सिनेमाचा टीझर दाखवण्यात आलाय. या टीझरमध्ये सनी देओलसोबत मराठमोळा अभिनेता उपेंद्र लिमयेही झळकताना दिसतोय.
'जाट'च्या टीझरमध्ये काय?
"शाम के साए में वो आता है और रोशनी से पहले गायब हो जाता है" अशा डायलॉगने टीझरची सुरुवात होते. पुढे हातात भलामोठा पंखा घेऊन सनी देओल गुंडांना लोळवताना दिसतो. अशातच कैदेत असलेला उपेंद्र लिमये शिट्टी वाजवून सनीपाजीला प्रोत्साहन देताना दिसतो. 'जाट'च्या टीझरच्या शेवटी रणदीप हूडाची खलनायक म्हणून एन्ट्री होते. शेवटी सनी देओल मोठ्याने 'सॉरी बोल' असं म्हणताना दिसतो. १ मिनिटं लांबीच्या या टीझरने प्रेक्षकांचं चांगलंच मन जिंकलंय.
'जाट' कधी रिलीज होणार?
२०२३ मध्ये 'गदर २'च्या माध्यमातून सनी देओलने प्रेक्षकांचं चांगलंच मन जिंकलं. सनी देओलचा सिनेइंडस्ट्रीतील दमदार कमबॅक म्हणून 'गदर २'कडे पाहिलं गेलं. आता 'जाट'च्या माध्यमातून सनी देओल पुन्हा एकदा प्रेक्षकांंच्या भेटीला येतोय. याशिवाय 'अॅनिमल' आणि 'मडगाव एक्सप्रेस'नंतर उपेंद्र लिमये पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये दिसणार आहे. 'जाट' हा सिनेमा एप्रिल २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सनी पाजीला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अॅक्शन करायला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.