अभिनेता सनी देओलने दामिनी, गदर, डर, बॉर्डर यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. तो सध्या पल पल दिल के पास या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटाचे तो दिग्दर्शन करत असून या चित्रपटाद्वारे त्याचा मुलगा करणला बॉलिवूडमध्ये लाँच करणार आहे. सनीने अभिनयानंतर आता त्याच्या नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. त्याने संरक्षणमंत्री निर्मला सितारमण आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. देशाला नरेंद्र मोदींसारख्या नेतृत्वाची गरज असल्याचं सनी देओलने म्हटलं आहे. पंजाबच्या गुरुदासपूरमधून सनी भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
'नरेंद्र मोदींनी या देशासाठी बरंच काही केलं असून पुढची पाच वर्षं त्यांनाच सत्ता मिळाली पाहीजे. माझे वडील अटल बिहारी वाजपेयींपासून भाजपासोबत जोडले गेले आहेत आणि मी नरेंद्र मोदी यांच्यापासून भाजपासोबत जोडलो गेलो आहे' असे सनी देओलने म्हटले. काही दिवसांपूर्वी भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि सनी देओल यांच्या भेटीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
सनी देओलचे वडील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे अनेक वर्षांपासून भाजपाशी जोडले गेलेले आहेत. 2004 मध्ये भाजपाच्या तिकिटावर त्यांनी राजस्थानच्या बिकानेरमधून निवडणूक लढवली होती. त्यांनी खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर स्वत:ला राजकारणापासून दूर ठेवले होते; परंतु ते मागील काही दिवसांपासून मथुरेत पत्नी हेमामालिनी यांचा निवडणूक प्रचार करत आहेत.
सनीने भाजपात प्रवेश करत असल्याची घोषणा केल्यापासून सोशल मीडियावर त्याची खिल्ली उडवली जात आहे. सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाले असून सध्या याचीच चर्चा सोशल मीडियावर आहे. सनीची इमेज चित्रपटात अँग्री मॅनची आहे यावरूनच हे मीम्स बनवण्यात आले आहेत.
गदर या चित्रपटातील एका दृश्याचा फोटो शेअर करत आता पुढील सर्जिकल स्ट्राईक सनी करणार असल्याचे त्यात म्हटले गेले आहे तर भाजपाचे आज ढाई किलोने वजन वाढले असे देखील एका मीममध्ये म्हणण्यात आले आहे.