सनी देओल सध्या ब्लँक या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाद्वारे डिम्पल कपाडियाची बहीण सिम्पल कपाडियाचा मुलगा करण कपाडिया बॉलिवूडमध्ये पर्दापण करत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्यान त्याने गदर या त्याच्या जुन्या चित्रपटाविषयी देखील मीडियासोबत गप्पा मारल्या.
सनी देओल आणि अमिषा पटेल यांची मुख्य भूमिका असलेला गदर हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाच्या कथेची, या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाची त्यावेळी चांगलीच चर्चा झाली होती. या चित्रपटाला अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. फाळणीदरम्यान सकिना ही मुस्लीम मुलगी कुटुंबापासून वेगळी होते आणि एका शिखासोबत लग्न करते. त्यांचा संसार सुरळीत सुरू असतानाच सकिनाला पाकिस्तानात स्थायिक असलेल्या आपल्या कुटुंबियाविषयी कळते आणि आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी पाकिस्तानला जाण्याचा ती नवऱ्याकडे हट्ट करते. पाकिस्तानात गेल्यावर तिचे परत येण्याचे सगळे मार्ग बंद होतात. अशा परिस्थितीत नायक आपल्या पत्नीला भारतात परत कशाप्रकारे आणतो हे आपल्याला गदर या चित्रपटात पाहायला मिळाले होते.
गदर एक प्रेम कथा या चित्रपटाच्या १८ वर्षांनंतर या चित्रपटाचा नायक सनी देओलने या चित्रपटाबाबत एक खुलासा केला आहे. या चित्रपटाचा शेवट वेगळा असणार होता. पण या शेवटामुळे चित्रपट फ्लॉप होईल अशी भीती वाटत असल्याने ऐनवेळी शेवट बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता असे त्याने एका मुलाखतीच्या दरम्यान नुकतेच सांगितले. सुरुवातीला चित्रीत करण्यात आलेल्या कथानकानुसार, सकिनाला गोळी लागते आणि त्यात तिचा मृत्यू होतो असे दाखवण्यात आले होते. पण चित्रपटाचा शेवट ट्रजिक असल्याने तो प्रेक्षकांना आवडेल की नाही याबाबत सगळ्यांनाच शंका होती आणि त्यामुळे सकिना मुलाचे गाणे ऐकते आणि उठते असे चित्रपटात दाखवण्यात आले. प्रेक्षकांना चित्रपटाचा हा शेवट खूपच आवडला होता.
गदर या चित्रपटातील सगळीच गाणी गाजली होती. तसेच या चित्रपटातील सगळेच संवाद आजही प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहेत.