'गदर 2' (Gadar 2) मुळे चर्चेत असलेला अभिनेता सनी देओल (Sunny Deol) दोन दिवसांपासून आणखी एका कारणानेही चर्चेत आहे. 'गदर 2' ला मिळत असलेलं अभूतपूर्व यश तो एन्जॉय करतोय. तर दुसरीकडे त्याच्या मुंबईतल्या 'सनी व्हिला' (Sunny Villa) विघ्न आलं. व्हिलावरील कर्ज न फेडल्याप्रकरणी त्याच्या बंगल्याचा लिलाव होणार होता. बँक ऑफ बडोदाने दोन दिवसांपूर्वी हे जाहीर केलं खरं पण आज बँकेने यू-टर्न घेत लिलाव रद्द केला. अभिनेत्याच्या या चर्चेत असलेल्या 'सनी व्हिला' मध्ये नक्की काय काय आहे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
'सनी व्हिला' हा पाच मजली असून ६०० स्क्वेअर मीटरमध्ये पसरला आहे. शिल्पा शेट्टी, गोविंदा आणि श्रद्धा कपूर हे सेलिब्रिटी राहतात त्यांच्याच बाजूला सनी व्हिला स्थित आहे. बंगल्यात मूव्ही थिएटर, प्रोडक्शन ऑफिस आणि टेरेस गार्डनही आहे. डबिंग स्टूडिओसाठी बंगला प्रसिद्ध आहे. याठिकाणी अनेक सुपरहिट सिनेमांचं डबिंग झालं आहे. या व्हिलाला इंडस्ट्रीत सनी सुपर साऊंड नावाने ओळखलं जातं. याच बंगल्यात ५० वर्षांपूर्वी धर्मेंद्र यांच्या प्रतिज्ञा सिनेमाची निर्मिती केली होती. अनेक सेलिब्रिटींनी बंगल्यातील थिएटर सिनेमाच्या प्रायव्हेट स्क्रीनिंगसाठी वापरले.
सनी व्हिलाचा काय आहे वाद?
सनी देओलला २० ऑगस्टला बँक ऑफ बडोदाने नोटीस बजावली होती. सनी देओलने जवळपास ५६ कोटींचे कर्ज घेतले होते, जे त्याने फेडले नाही. त्याबाबत त्याच्या बंगल्याचा लिलाव करण्यात येईल, असे नोटीसमध्ये म्हटले होते. बँकेने लिलावाची तारीखही जाहीर केली. २५ सप्टेंबरला ई-लिलाव होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र २१ ऑगस्ट रोजी सकाळी बँकेने लिलावावर स्थगिती आणल्याची बातमी समोर आली. दरम्यान, बँकेने सनी देओलला २०१६ मध्ये चित्रपट निर्मितीसाठी हे कर्ज दिले होते.