अभिनेता सनी देओल (Sunny Deol) सध्या 'गदर 2' मिळत असलेलं यश एन्जॉय करतोय. गदर हा खरंतर प्रेक्षकांसाठी फक्त सिनेमा नाही तर इमोशन आहे. सनी देओलला इतक्या वर्षांनी पुन्हा तारासिंगच्या भूमिकेत पाहून चाहत्यांना आनंद झालाय. तारासिंगच्या एकेका डायलॉगवर प्रेक्षकांच्या शिट्ट्या ऐकू येतात. सनी देओलच्या परफॉर्मन्सवर अख्खी सिनेइंडस्ट्री फिदा आहे. मात्र सनीला एक गंभीर आजार आहे ज्यामुळे त्याला वाचताही येत नाही असा खुलासा त्याने नुकताच एका मुलाखतीत केला.
सनी देओल डिस्लेक्सिया (Dyslexia) या गंभीर आजाराचा सामना करतोय. या आजारात त्याला स्क्रीप्ट वाचतानाही अडचण येते. तो म्हणाला, 'मला माझे डायलॉग आणि सीन ऐकवले जातात. कारण मला स्क्रीप्टच वाचता येत नाही. लहानपणी मला चांगले मार्क्स मिळायचे नाहीत म्हणून मार पडायचा. पण तेव्हा कोणाला कळलं नाही की मला डिस्लेक्सिया आहे. मला प्रेक्षकांसमोर बोलायचीही भीती वाटते कारण तिथे टेलिप्रॉम्पटर वाचायचं असतं जे माझ्यासाठी कठीण आहे.'
याआधीही सनी एका शोमध्ये म्हणाला होता की,'मला वाचायला कठीण जात असल्याने मी जे फील करतो तेच दाखवतो. दिग्दर्शक जेव्हा मला स्क्रीप्ट देतात तर मी त्यांनाच वाचायला सांगतो जे त्यांना माझ्याकडून बोलून घ्यायचं आहे. मग मी माझ्या स्टाईलने डायलॉग म्हणतो.'
सनी देओलच्या या आजाराबद्दल खूप कमी जणांना माहित होतं. मात्र तरी सनीचा मोठ्या पडद्यावरचा परफॉर्मन्स पाहता त्याचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. सनीच्या साधेपणामुळे प्रेक्षक नेहमीच प्रभावित होतात. 'गदर 2' च्या यशानंतर सनी देओल वडीलांना घेऊन अमेरिकेला गेला आहे. तिथे धर्मेंद्र यांचं रुटीन चेकअप आहे. तसंच दोघंही सुट्ट्यांचा आनंद घेणार आहेत.