सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) इंडस्ट्रीत त्याच्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळेही ओळखला जातो. तो जवळच्या माणसांच्या मदतीसाठी कायम पुढे असतो. त्याचे इंडस्ट्रीत अनेक जवळचे मित्र आहेत. त्यातच आहे देओल कुटुंब. सलमानचा धर्मेंद्र यांच्यावर खूप जीव आहे. तसंच त्यांच्या दोन्ही मुलांसोबत सलमानची चांगली मैत्री आहे. नुकतंच सनी देओलने (Sunny Deol) सलमानचं देओल कुटुंबाशी किती जिव्हाळ्याचं नातं आहे यावर प्रतिक्रिया दिली.
सलमान आणि सनी देओल नुकतेच एका टीव्ही शोमध्ये आले होते. दोघांनी एकमेकांसोबत भरपूर मजामस्ती केली. एकमेकांच्या स्टाईलची नक्कलही केली. सलमानने सनीचे आयकॉनिक मूव्ह्ज दाखवले तर सनीने सलमानची स्टाईल पकडली. सनी म्हणाला, "हे काही फक्त शोसाठी नाही तर आमच्यात खरोखरंच इतका जिव्हाळा आणि आपुलकी आहे जी अनेक वर्षांपासून आहे. सलमान इंडस्ट्रीत येण्याच्या आधीपासूनचा हा बाँड आहे."
त्याने जोर देऊन सांगितले की, "विशेषत: सलमानचं देओल कुटुंबाशी जे नातं आहे ते केवळ प्रोफेशनल नाही. सलमानच्या मनात आमच्याबद्दल खरं प्रेम आणि आदराची भावना आहे. काळानुसार हा बाँड अधिकाधिक मजबूत होत आहे. प्रत्येक व्यक्तीची स्वत:ची वेगळी ओळख असते. सलमान असा आहे जो आपल्या सोबतच्या कलाकारांसाठी कायम उभा असतो. इंडस्ट्रीत सकारात्मक आणि सपोर्टिव्ह वातावरण बनवण्यासाठी त्याचंही योगदान आहे."