Join us

न्यायालयाने सेन्सॉर बोर्डाला फटकारल्याने सनी देओलचा ‘मोहल्ला अस्सी’ होणार अखेर रिलीज!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 4:46 PM

अभिनेता सनी देओलचा ‘मोहल्ला अस्सी’ हा चित्रपट तुम्हाला आठवतोय काय? होय, अगदी बरोबरच तोच चित्रपट जो अद्यापपर्यंत रिलीज झाला ...

अभिनेता सनी देओलचा ‘मोहल्ला अस्सी’ हा चित्रपट तुम्हाला आठवतोय काय? होय, अगदी बरोबरच तोच चित्रपट जो अद्यापपर्यंत रिलीज झाला नाही, परंतु सर्वांनी बघितला आहे. कारण हा चित्रपट रिलीज होण्याअगोदरच इंटरनेटवर लिक झाला आहे. त्यामुळे एकेकाळी हा चित्रपट प्रत्येकाच्याच मोबाइलमध्ये होता. शिवाय लोकांनी तो एकमेकांना शेअरही केला. आता तुम्ही म्हणाल की, चित्रपट लिक झाला असतानाही निर्मात्यांनी त्यास का रिलीज केले नाही? तर रिलीज न करण्यामागचे एकमेव कारण म्हणजे या चित्रपटात असलेली अश्लीलता आणि शिवीगाळ होय. या कारणांमुळेच सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला अद्यापपर्यंत ग्रीन सिग्नल दाखविला नव्हता. सेन्सॉर बोर्डाच्या मते, या चित्रपटातून लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा चित्रपट रिलीज करणे धार्मिकदृष्ट्या धोकादायक ठरू शकते. मात्र आता ‘मोहल्ला अस्सी’च्या निर्मात्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बातमीनुसार दिल्ली न्यायालयाने सेन्सॉर बोर्डाला हा चित्रपट एका आठवड्याच्या आत रिलीज करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर चित्रपटाला ‘ए’ सर्टिफिकेट देण्याचे फर्मानही सोडले आहे. दरम्यान, सेन्सॉरने चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ. चंद्रप्रकाश दिवेदी यांना सांगितले होते की, त्यांनी चित्रपटातील दहा सीन काढून टाकावेत. परंतु न्यायालयाने सेन्सॉरच्या या मागणीला फटकारताना केवळ एकच सीन काढण्याचे सांगितले आहे. हा चित्रपट ‘काशी का अस्सी’ या चर्चित कादंबरीवर आधारित आहे. ही कादंबरी साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात चर्चेचा विषय बनली होती. दरम्यान, चित्रपटात सनी देओलची मुख्य भूमिका असून, त्याने चित्रपटात प्रचंड शिवीगाळ केली आहे. सनी देओल व्यतिरिक्त अभिनेत्री साक्षी तन्वर, रवी किशन, सौरभ शुक्ला, मुकेश तिवारी, राजेंद्र गुप्ता, मिथिलेश चतुर्वेदी यांच्याही चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.