सनी देओल आणि अमिषा पटेल यांची मुख्य भूमिका असलेला गदर हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाच्या कथेची, या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाची त्यावेळी चांगलीच चर्चा झाली होती. या चित्रपटाला अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. फाळणीदरम्यान सकिना ही मुस्लीम मुलगी कुटुंबापासून वेगळी होते आणि एका शिखासोबत लग्न करते. त्यांचा संसार सुरळीत सुरू असतानाच सकिनाला पाकिस्तानात स्थायिक असलेल्या आपल्या कुटुंबियाविषयी कळते आणि आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी पाकिस्तानला जाण्याचा ती नवऱ्याकडे हट्ट करते. पाकिस्तानात गेल्यावर तिचे परत येण्याचे सगळे मार्ग बंद होतात. अशा परिस्थितीत नायक आपल्या पत्नीला भारतात परत कशाप्रकारे आणतो हे आपल्याला गदर या चित्रपटात पाहायला मिळाले होते.
गदर एक प्रेम कथा हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज 20वर्षं पूर्ण झाली. या चित्रपटात सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या मुलाच्या भूमिकेत दिसलेला चिमुरडा आज प्रसिद्ध अभिनेता बनला आहे. या मुलाचे नाव उत्कर्ष शर्मा असून तो 'गदर'चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा आहे.
उत्कर्षने गदरनंतर अब तुम्हारे हवाले वतन साथियों या चित्रपटात अमिताभ यांच्यासोबत काम केले होते. त्याने 'जीनिअस' या चित्रपटाद्वारे नायक म्हणून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. एक्शन आणि रोमान्सने भरपूर हा मसालापट उत्कर्षचा पहिला सिनेमा होता. अनिल शर्मा यांनीच या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमात मिथुन चक्रवर्ती यांचीही महत्वाची भूमिका होती तर नवाजुद्दीन सिद्दीकी व्हिलनच्या भूमिकेत दिसला होता.