Join us

सनी देओलचा आगामी सिनेमा 'मोहल्ला अस्सी' या तारखेला होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 07:15 IST

सनी देओल आणि साक्षी तंवर यांची मुख्य भूमिका असलेला 'मोहल्ला अस्सी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ठळक मुद्दे सनी देओल आणि साक्षी तंवर पहिल्यांदाच एकत्र

सनी देओल आणि साक्षी तंवर यांची मुख्य भूमिका असलेला 'मोहल्ला अस्सी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनातील सर्व अडथळे दूर झाले असून येत्या १६ नोव्हेंबर रोजी तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

'मोहल्ला अस्सी' हा चित्रपट काशिनाथ सिंग यांच्या ‘काशी का अस्सी’ या कादंबरीवर आधारित आहे. गेल्या दोन वर्षांपासून सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणित होण्याची प्रतिक्षा हा चित्रपट करत होता. जेव्हा हा चित्रपट ट्रायब्यूनलकडे गेला, तेव्हा त्यामध्ये १० कट्स सुचवण्यात आले होते. त्याचप्रमाणे ‘मंदिर’ आणि ‘शौचालय’ या शब्दांचा उल्लेखदेखील टाळण्यास सांगण्यात आले होते. ट्रायब्यूनलने सुचवलेल्या कट्समुळे चित्रपटाचा २० मिनिटांचा भाग काढून टाकावा लागला असता आणि त्यामुळे कथेचाही सार नष्ट झाला असता, असे निर्मात्यांचे म्हणणे होते. त्यामुळेच निर्मात्यांनी नोव्हेंबर २०१६ मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने ११ डिसेंबर रोजी याप्रकरणी निर्णय दिला होता. चित्रपट प्रमाणित करून प्रदर्शनाची वाट मोकळी करण्याचे आदेश न्यायालयाने सेन्सॉर बोर्डाला दिले होते. त्याचप्रमाणे सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या १० कट्सपैकी ९ कट्स न्यायालयाने रद्द केले होते.चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित या चित्रपटाच्या शूटिंगला २०११ मध्ये सुरुवात झाली होती. या चित्रपटाची संपूर्ण शूटिंग वाराणसीच्या अस्सी मोहल्ला परिसरात झाली. कादंबरीतील मुख्य पात्र तन्नी गुरू यांची भूमिका सनी देओल साकारत आहे. मोहल्ला अस्सी हा चित्रपट १६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

टॅग्स :सनी देओल