केरळमध्ये पुराने थैमान घातले आहे. आत्तापर्यंत तीनशेवर बळी गेले आहेत. अडीच लाखांवर लोक बेघर झाले आहेत. अशास्थितीत संपूर्ण देश केरळच्या मदतीसाठी एकवटला आहे. केरळातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देशभरातून मदतीचा ओघ येत आहे, बॉलिवूडही यात मागे नाही. शाहरूख खानपासून अक्षय कुमार अनेक बॉलिवूड कलाकार केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत, याचदरम्यान बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी हिने केरळमधील लोकांच्या मदतीसाठी ५ कोटी रूपये दिल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पूर्वाश्रमीच्या आयुष्यात तुम्ही काय होतात, याने काहीही फरक पडत नाही़ आज तुम्ही काय आहात, हे अधिक महत्त्वाचे. ज्या महिलेने तीन मुलांना स्वीकारले, त्या सनी लिओनीने आता केरळसाठी ५ कोटी रूपयांची मदत दिली आहे, अशा आशयाची पोस्ट एका युजरने शेअर केली आहे, सनीच्या या दानशूरपणाची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होतेय. अनेक लोक तिची तुलना पेटीएमचे मालक विजय शेखर शर्माशी करत आहेत.( विजय शेखर शर्माने केरळसाठी केवळ १० हजार रूपयांची मदत दिली. शिवाय याचा प्रचार करण्यासही ते विसरले नाहीत.)पण सनीने खरोखरचं ५ कोटी रूपयांची मदत दिली का? हा खरा प्रश्न आहे. स्वत: सनीने सोशल मीडिया वा अन्य कुठेही असा दावा केलेला नाही. यांसदर्भात सनी व तिचा पती डेनियल वेबर याला याबाबत विचारले असता त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला. सनी लिओनीच्या मॅनेजरला विचारले असता त्यानेही यावर बोलणे टाळले. सनीने केरळ पूरग्रस्तांना मदत केलीय. पण किती, हे ती जगजाहिर करू इच्छित नाही. कारण ही अतिशय खासगी बाब आहे, एवढेच तो म्हणाला.
तसेही सनीबद्दल केरळवासीयांचे वेड लपलेले नाही. एक वर्षांपूर्वी सनी कोच्चीला गेली होती तेव्हा तिला पाहण्यासाठी लाखो लोक रस्त्यांवर आले होते. त्यांना थोपवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला होता.