अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेला ‘संजू’ हा चित्रपट आपण पाहिला. ‘संजू’नंतर आता आपल्याला संजय दत्तची कहाणी त्याच्याच शब्दांत वाचायला मिळणार आहे. होय, संजय दत्तने आत्मचरित्र लिहिण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षी संजयच्या वाढदिवसाला म्हणजे २९ जुलैला या आत्मचरित्राचे प्रकाशन होणार आहे.हार्पर कॉलिन्स प्रकाशित करणार असलेल्या या आत्मचरित्रात संजयच्या अभिनय क्षेत्रातील उपलब्धींसोबतचं त्याच्या आयुष्यातील अनेक चढ-उतार असतील. तूर्तास या आत्मचरित्राचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. पण या पुस्तकाची घोषणा मात्र झाली आहे.संजयने स्वत: ही माहिती दिली आहे. ‘मी एक असामान्य आयुष्य जगतो आहे. जे अनेक चढ उतारांसह सुख, दु:खाने भरलेले आहे. माझ्याकडे तुम्हाला सांगण्यासारख्या अनेक रोमांचक गोष्टी आहेत. त्या गोष्टी ज्या आजपर्यंत मी कधीच जगासमोर उघड केल्या नाहीत. माझ्या कडूगोड आठवणी, माझे अनुभव, माझ्या भावना तुमच्यासमोर मांडण्यासाठी मी उत्सुक आहे,’ असे संजयने म्हटले आहे.संजयच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. संजयचे बायोपिक ‘संजू’ने बॉक्सआॅफिसवर अभूतपूर्व कमाई केली आहे.३०० कोटींच्या आकड्याकडे या चित्रपटाची घोडदौड सुरू आहे. एकंदर काय तर ‘संजू’ला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेय. आता संजूच्या आत्मचरित्राला वाचक कसा प्रतिसाद देतात, ते बघायचेयं.