अदा शर्मा स्टारर चित्रपट 'द केरळ स्टोरी' आता बंगालमध्येही रिलीज होत आहे. या चित्रपटावर बंदी घालण्याच्या ममता बॅनर्जी यांच्या सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या चित्रपटावर राज्य सरकारने घातलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने आज उठवली. आता लवकरच प्रेक्षकांना बंगालच्या चित्रपटगृहांमध्येही हा चित्रपट पाहता येणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये 'द केरळ स्टोरी'वर लादण्यात आलेल्या बंदीच्या विरोधात निर्मात्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
काय म्हणाले कोर्ट?यादरम्यान, कोर्ट म्हणाले, "आम्ही 8 मे रोजी पश्चिम बंगाल सरकारने चित्रपटावर घातलेली बंदी उठवत आहोत. या बंदीला कोणताही ठोस आधार नाही." यासोबतच न्यायालयाने तामिळनाडू सरकारला चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सर्व सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्याचे आणि चित्रपट पाहणाऱ्यांच्या सुरक्षेची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात, पश्चिम बंगाल सरकारने म्हटले होते की 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट बनावट तथ्यांवर आधारित आहे आणि त्यात द्वेष पसरवणाऱ्या गोष्टी आहेत. ज्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आज या चित्रपटावरील बंदी उठवली आहे.
'द केरळ स्टोरी' ला रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत आहे. रिलीजच्या 13 दिवसांनंतर चित्रपटाची एकूण 165.94 कोटी रुपयांची कमाई केली आहे. लवकरच तो 200 कोटी क्लबमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. 'द केरळ स्टोरी' चे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले असून यात अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.