अभिनेता सूरज पांचोली लवकरच 'सॅटेलाइट शंकर' चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट ५ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची संपूर्ण कमाई जवानांना देण्याचा निर्णय सूरजने घेतला आहे.
इरफान कमल दिग्दर्शित सॅटेलाइट शंकर चित्रपटाचे चित्रीकरण पंजाब, दक्षिण भारत व हिमाचलमधील चीन सीमेजवळ झाले आहे. या चित्रपटातील मुख्य अभिनेता सूरज पांचोलीने या चित्रपटाची संपूर्ण कमाई तीन वेगळ्या ठिकाणी असलेल्या जवानांना देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निधी जवानांच्या मुलांना व त्यांच्या सुविधेसाठी वापरता येईल.
याबाबत सूरज पांचोलीने सांगितले की, या चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव खूपच छान होता.जवानांन भेटलो. तसेच त्यांच्या कुटुंबांनादेखील भेटलो. वास्तविक ठिकाणी चित्रीकरण करण्याचा अनुभव अप्रतिम होता.
तो पुढे म्हणाला की, आपण जवानांमुळे इथे सुरक्षित राहत आहोत. ते सीमेवर आपली रक्षा करण्यासाठी सदेैव तत्पर असतात. कित्येक दिवस ते आपल्या कुटुंबियांना भेटत नाहीत. त्यामुळे त्यांना सहकार्य होईल, अशी गोष्ट मी करत आहे.
सूरज पांचोलीने ‘हिरो’ चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटानंतर तो रुपेरी पडद्यावर झळकला नाही. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर आता तो ५ जुलैला सॅटेलाइट शंकर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.