अभिनेता सूरज पांचोली तब्बल चार वर्षानंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन करतो आहे. २०१५ साली 'हिरो' चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री अथिया शेट्टी मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र आता तो कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. सूरज लवकरच 'सॅटेलाइट शंकर' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात सूरज जवानाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे प्रमोशनल ट्रॅकचे चित्रीकरण सूरजने जवानांसोबत केले आहे.
सूरजने 'सॅटेलाइट शंकर' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हिमाचल प्रदेशमधील चिटकुल, आग्रा, पंजाब, तमीळनाडू आणि महाराष्ट्रातील जवानांच्या कॅम्पला भेट दिली आहे. त्याने त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या कामाबद्दल व मेहनतीबद्दल जाणून घेतले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निर्मात्यांनी सूरज ज्या वीस जवानांना भेटला त्यांच्यासोबत प्रमोशनल ट्रॅक बनवण्याचे ठरवले आहे. या व्हिडिओचे शूटिंग १५ मे रोजी मुंबईत पार पडणार आहे.याबाबत सूरज म्हणाला की,'आमचा सिनेमा आम्हाला जवानांना व त्यांच्या मेहनतीला समर्पित करायचा आहे.'
या चित्रपटाच्या अनुभवाबाबत सूरज म्हणाला की,'आपण जवानांमुळे इथे सुरक्षित राहत आहोत. ते सीमेवर आपली रक्षा करण्यासाठी सदेैव तत्पर असतात. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात आपले जवान शहीद झाले. कित्येक दिवस ते आपल्या कुटुंबियांना भेटत नाहीत. '
मला आठवते आहे की चिटकुलमध्ये पहिल्या शेड्युलचे चित्रीकरण जवानांच्या कॅम्पपासून काही अंतरावर सेट उभारण्यात आला होता. जेव्हा तिथल्या जवानांनी शूटिंग पाहिले तेव्हा त्यांनी खऱ्या जवानांच्या कॅम्पमध्ये आमचे स्वागत केले होते. तिथे दुपारचे जेवण व नाश्ता दिला होता. आम्ही त्यावेळी त्यांच्याशी गप्पा मारल्या होत्या. त्यांच्या कथा ऐकून खूप काही शिकायला मिळाल्याचे सूरजने सांगितले.