चित्रपटसृष्टीतील अत्यंत मानाच्या 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे आज दिल्लीत वितरण करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही वेगवेगळ्या भाषांमधील सर्वोत्कृष्ट सिनेमांना या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात येत आहे. दिल्लीमध्ये या पुरस्काराचे वितरण होत आहे. या पुरस्कार सोहळ्यात सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांनी...
सुरेखा सिक्री यांना बधाई हो या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. सुरेखा सिक्री या गेल्या कित्येक महिन्यांपासून आजारी असल्याने हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्या व्हिलचेअरवरून आल्या. त्यांचे वजन कित्येक किलो कमी झाले असून त्या प्रचंड अशक्त दिसल्या.
बालिकावधू या मालिकेत सुरेखा सिक्री यांनी साकारलेली भूमिका चांगलीच गाजली होती. याच मालिकेत जग्याची भूमिका साकारलेल्या शंशाक व्यासने सुरेखा सिक्री यांचे फोटो काही महिन्यांपूर्वी त्याच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर शेअर केले होते. या फोटोत त्या खूपच बारीक दिसत होत्या. सुरेखा सिक्री यांना गेल्यावर्षी ब्रेन स्ट्रोक झाला होता आणि त्यानंतर अर्धांगवायूचा झटका देखील आला होता. त्यांनीच याविषयी एका मुलाखतीत सांगितले होते की, मी गेल्या वर्षी एका चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना सेटवरच चक्कर येऊन पडले होते. मला ब्रेन स्ट्रोक झाला होता. पण आता माझ्या तब्येतीत चांगलीच सुधारणा होत आहे.
याविषयी सुरेखा यांनी पुढे सांगितले होते की, बधाई हो हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर महिन्याभरातच मला ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यानंतर मला अर्धांगवायूचा झटका देखील आला. या सगळ्यामुळे मला जेवणच जात नव्हते. यामुळे माझे वजन देखील खूपच कमी झाले. माझे संपूर्ण कुटुंब गेल्या काही महिन्यांपासून माझी काळजी घेत असून मी लवकरच पूर्णपणे बरी होईल याची मला खात्री आहे.
सुरेखा सिक्री यांनी झोया अख्तरची एक शॉर्ट फिल्म साईन केली असून त्या लवकरच यासाठी चित्रीकरण करायला देखील सुरुवात करणार आहेत. सुरेखा सिक्री गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीचा भाग असून त्यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे.