बॉलिवूड,टीव्ही, थिएटरच्या दुनियेत मोठं नाव असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सीकरी (Surekha Sikri ) यांचे आज निधन झाले. (Surekha Sikri Death) टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘बालिका वधू’ मध्ये त्यांनी उत्कृष्ट भूमिका साकारली होती. तसेच त्यांनी ‘बधाई हो’ या चित्रपटातदेखील लक्षवेधी भूमिका साकारली होती. त्यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 19 एप्रिल 1945 रोजी नवी दिल्लीत जन्मलेल्या सुरेखा सीकरी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये ठळक भूमिका साकारल्या. तब्बल 3 वेळा उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवला. पण खरे तर सुरेखा यांना अभिनेत्री व्हायचेच नव्हते. त्यांना पत्रकार वा लेखिका व्हायचे होते.
बालपणापासून पत्रकार होण्याचे स्वप्नं त्यांनी उराशी बाळगले होते. पण नियतीने कदाचित नशीबात वेगळेच लिहून ठेवले होते. सुरेखा अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीत शिकत होत्या. एकदा त्यांच्या कॉलेजमध्ये अब्राहम अलकाजी साहब पोहोचले आणि त्यांनी ‘द किंग लियर’ हे नाटक सादर केले. या नाटकाने अशी काही जादू केली की सुरेखा सिकरी थेट नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा अर्थात एनएसडीमध्ये प्रवेश घेण्यासाठी पोहोचल्या. प्रवेश अर्ज घेऊनच त्या घरी पोहोचल्या. अर्थात अनेकदिवस हा अर्ज त्यांनी भरला नाही. अखेर आईच्या म्हणण्यावरून त्यांनी तो फॉर्म भरला आणि पुढे एनएसडीमध्ये दाखल झाल्या.
येथून बाहेर पडल्यावर त्यांनी दीर्घकाळ रंगभूमी गाजवली आणि नंतर चित्रपटांत आल्या. किस्सा कुर्सी का, नसीब, सरदारी बेगम, दिल्लगी, नजर, जुबेदा, रेनकोट, तुमसा नहीं देखा, बधाई हो, घोस्ट स्टोरीज अशा अनेक सिनेमांत त्यांनी अफलातून भूमिका साकारल्या.बालिका वधू या मालिकेतील दादीसाच्या भूमिकेनं त्यांना घराघरात लोकप्रियता मिळवून दिली. आज मात्र सर्वांची लाडकी दादीसा आपल्याला कायमची सोडून गेली. 2020 मध्ये त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हॉस्पिटलमध्ये जवळपास 15 दिवस ट्रिटमेंट घेतल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, त्यानंतर त्यांची प्रकृती खालावतच गेली. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.