टेलिव्हिजन ते बॉलिवूड असा यशस्वी प्रवास करणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. अचानक आलेल्या सुशांतच्या आत्महत्याच्या वृत्ताने सगळेच हैराण झाले आहेत. त्याने इतक्या टोकाचं पाऊल का उचलले असेल असा सर्वांनाच प्रश्न पडला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते महेश भट यांच्या सहकारी लेखिका सुऱ्हिता सेनगुप्ता यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत यावरच बरेच धक्कादायक खुलासे केले आहेत.
लेखिका सुऱ्हिता सेनगुप्ता म्हणाल्या, “सडक- 2 मध्ये भूमिका मिळावी म्हणून सुशांत महेश भट यांना भेटायला आला होता. त्या दोघांमध्ये लगेचच गप्पा सुरु झाल्या. कारण सुशांत एक चांगला गप्पा मारणारा व्यक्ती होता. जगातील कुठल्याही विषयावर बोलू शकायचा. अगदी क्वांटम फिजिक्सपासून ते सिनेमापर्यंत, कशावरही तो बोलायचा. या गप्पांमध्ये महेश भट यांना सुशांतच्या अवस्थेचा अंदाज आला होता. त्यांना त्याची अवस्था परवीन बाबीसारखी झाल्यासारखी वाटली. महेश भट्ट यांनी ती अवस्था पाहिली होती. त्यांना माहित होतं की यावर औषध गोळ्यांशिवाय इतर कुठल्याच गोष्टीचा पर्याय नाही माहित होतं.
एकेदिवशी सुशांत घरात अनुराग कश्यपचा सिनेमा बघत होता आणि तो रियाला म्हणाला, की मी कश्यपच्या सिनेमाची ऑफर नाकारली आहे. तो आता माझा खून करण्यासाठी येईल. रिया या प्रकाराने खूप घाबरली आणि तिला त्याच्यासोबत राहण्याची भीती वाटू लागली. महेश भट्ट यांनी देखील रियाला त्याच्यासोबत राहून आता उपयोग होणार नाही, उलट तू राहिली तर तुझेही मानसिक आरोग्य बिघडेल असं त्यांनी सांगितलं, असं सेनगुप्ता यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या की, त्यानंतर रियाने तिथे न राहण्याचा निर्णय घेतला. रिया सुशांतची बहिण तिथे येईपर्यंत थांबली. त्याच्या बहिणीने देखील तिच्या पातळीवर सर्वोत्तम प्रयत्न केले आणि सुशांतला बरे वाटावे म्हणून प्रयत्न केले. मात्र, सुशांत कुणाचेही ऐकण्याच्या पलिकडे गेला होता. तो त्याची औषधेदेखील घेत नव्हता. मागील महिन्याभरात तर सुशांत त्याच्या मानसिक कैदेत होता. तो कुणालाही त्याच्यापर्यंत पोहचू देत नव्हता. तो खोल, अधिक खोल रुतत होता.