बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने तिच्यावर केलेल्या आरोपांवरील चुप्पी नुकतीच तोडली आहे. एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने सुशांतबद्दलच्या बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा खळबळ माजली. रिया चक्रवर्तीने सुशांतच्या कुटुंबासोबत त्याचे मित्र आणि एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेबद्दल बरेच दावे केले. तिने केलेल्या दावे अंकिता लोखंडे हिने फेटाळून लावले आहेत. अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर एका पोस्टच्या माध्यमातून रिया चक्रवर्तीला चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.
अंकिता लोखंडे हिने इंस्टाग्रामवर पोस्टवर लिहिले की, रिलेशनशीपला सुरूवात झाल्यापासून 23 फेब्रुवारी, 2016 पर्यंत मी आणि सुशांत एकत्र होतो तोपर्यंत त्याला कोणत्याही प्रकारचे डिप्रेशन नव्हते. सुशांत पूर्णपणे बरा होता.
तिने सांगितले की, मी आतापर्यंत माझ्या मुलाखतीत एकच गोष्ट सांगितली आहे की सुशांत जोपर्यंत माझ्यासोबत होता तोपर्यंत तो बरा होता. त्याला कोणत्याही प्रकारचे डिप्रेशन नव्हते. आम्ही त्याच्या यशाची स्वप्न एकत्र पाहत होतो आणि मी प्रार्थना करत होते आणि तो यशस्वी होत होता. हेच मी आतापर्यंत सांगितले आहे.