Join us

सुशांत सिंग राजपूतचे पार्थिव बिहारला नेण्यासाठी नाकारली परवानगी, मुंबईतच होणार अंतिम संस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 10:22 AM

सुशांत सिंग राजपूतने रविवारी वांद्रे येथील त्याच्या घरात आत्महत्या केली.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने रविवारी वांद्रे येथील त्याच्या घरात आत्महत्या केली. त्याचे पार्थिव पाटण्याला नेण्यासाठी कुटुंबाने परवानगी मागितली होती. मात्र ही परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे आज त्याच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार पार पडणार आहे. पाटणावरून सुशांत सिंग राजपूतचे वडील, भाऊ, वहिनी मुंबईत येण्यासाठी रवाना झाले आहेत.मुंबईत आज सुशांतवर अंत्यसंस्कार होणार असल्याने त्याचे वडील केके सिंह आणि पाटणा इथला चुलत भाऊ आणि सुपौलचे भाजप आमदार नीरज कुमार बाबूल यांच्यासह अन्य दोन सदस्य सकाळीच विमानाने मुंबईला रवाना झाले. त्याच्या कुटुंबापैकी वडिल हजर असतील तर सुशांतच्या आईचे २००२ मध्ये निधन झाले. याशिवाय त्याला चार बहिणी देखील आहेत, त्यापैकी एक मीटू सिंग राज्यस्तरीय क्रिकेटपटू असल्याचे सांगितले जात आहे. सुशांतनं काल (रविवारी) त्याच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या घरातून पोलिसांनी कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही. मध्यरात्री सुशांतनं एका अभिनेत्याला शेवटचा फोन केला होता. मात्र त्या अभिनेत्यानं फोन उचलला नाही. त्यामुळे दोघांचं बोलणं होऊ शकलं नाही. सुशांतला गेल्या ६ महिन्यांपासून नैराश्यानं ग्रासल्याची माहिती पोलिसांनी दिली. रविवारी सकाळी दहाच्या सुमारास सुशांतनं ज्युस मागवला. त्यानंतर तो त्याच्या खोलीत गेला. सुशांत बराच वेळ बाहेर आला नाही. त्यामुळे त्याच्या मित्रांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला. पण दरवाजा लॉक होता. अखेर घरातील नोकरांनी चावी तयार करणाऱ्याला बोलावलं. त्यानंतर दार उघडण्यात आलं. त्यावेळी सुशांतचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर नोकरांनी याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. सुशांतच्या वांद्रे येथील घरात चार जण राहतात. त्यामध्ये दोन आचारी, एक नोकर आणि एका आर्ट डिझायनराचा समावेश आहे. हा आर्ट डिझायनर सुशांतचा मित्र आहे.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत