सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान यांचा ‘केदारनाथ’ हा चित्रपट पुन्हा अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. होय, टीजर रिलीज होताच, या चित्रपटाने वाद ओढवून घेतला आहे. टीजर पाहिल्यानंतर उत्तराखंडातील केदारनाथ मंदिरातील पुजा-यांनी या चित्रपटावर तीव्र प्रतिक्रिया देत, या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. ‘केदारनाथ’ हा चित्रपट हिंदुंच्या भावना दुखावणारा आहे, असा दावा या पुजा-यांनी केला आहे.केदार सभा या केदारनाथ मंदिरातील पुजा-यांच्या संघटनेचे अध्यक्ष विनोद शुक्ला यांनी या चित्रपटाविरोधात आंदोलन छेडण्याचाही इशारा दिला आहे. हा चित्रपट लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारा आहे. हिंदूंच्या भावना दुखावणा-या या चित्रपटावर बंदी लादली जावी अन्यथा आम्ही रस्त्यांवर उतरू, असे शुक्ला यांनी म्हटले आहे.काही लोकांनी रूद्रप्रयागच्या जिल्हा मुख्यालयासमोर या चित्रपटाविरोधात निदर्शने केल्याचेही कळतेय. चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले, तेव्हापासूनच चित्रपटाला विरोध होत असल्याचे कळतेय. भाजपाचे नेते अजेंद्र अजय यांनीही टिष्ट्वट करत या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. उत्तराखंडातील महाप्रलयात हजारो लोकांनी आपले प्राण गमावले होते. याच महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटातील जोडप्यास बोल्ड सीन देताना देताना दाखवले आहे, असे त्यांनी आपल्या टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे. एक हिंदू मुलगा एका एक मुस्लिम मुलीला आपल्या पाठीवर वाहून नेताना यात दाखवले आहे. हे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे आहे. कारण केदारनाथमध्ये कधीही मुस्लिम व्यक्तिला कुणी पाठीवर वाहून नेणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. ‘प्यार तीर्थयात्री है’ या चित्रपटाच्या टॅगलाईनवरही अजय यांनी आक्षेप नोंदवला आहे. केदारनाथ मंदिराजवळ या चित्रपटातील एका अश्लिल गाण्याचे शूटींग केले गेले, तेव्हाही या भागातील अनेक लोकांनी याचा विरोध केला होता.‘केदारनाथ’ या चित्रपटातून सैफ अली खानची मुलगी सारा अली खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. या चित्रपटात ती सुशांत सिंग राजपूतसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.
सारा अली खानचा डेब्यू चित्रपट ‘केदारनाथ’ पुन्हा वादात, पुजाऱ्यांनी केली बंदी लादण्याची मागणी!!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2018 2:30 PM