अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूचे रहस्य दिवसेंदिवस आणखी गडद होत असताना सीबीआयने नियुक्त केलेले एम्सचे फॉरेन्सिक एक्सपर्ट डॉ. सुधीर गुप्ता यांनी प्राथमिकदृष्ट्या या पोस्टमार्टम रिपोर्टमधील काही ठळक त्रूटींवर नेमके बोट ठेवले आहे. सीबीआयने पोस्टमार्टम रिपोर्टची फेरतपासणी करण्यासाठी एम्सच्या चार डॉक्टरांची एक टीम तयार केली आहे. डॉ. सुधीर गुप्ता या टीमचे नेतृत्व करत आहेत. ही टीम सुशांतच्या पोस्टमार्टम रिपोर्टवर आपले मत देतील. सुशांतच्या पोस्टमार्टमवर अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतच्या मृतदेहाच्या छायाचित्रांबाबतही सीबीआय टीम समाधानी नाही.
काय म्हणाले डॉ. सुधीर गुप्ता?सुशांतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मृत्यूची वेळ नोंदवलेली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये टाइम स्टँम्प नाही, ही गंभीर बाब आहे. मुंबई पोलिसांनी याबद्दल पोस्टमार्टम करणाºयांना प्रश्न विचारला हवे होते. वेळेचा कॉलम रिकामा का सोडला गेला, असा प्रश्न करायला हवा होता. पण मुंबई पोलिसांनी त्याकडे लक्ष दिले नाही. शिवाय मुंबई पोलिसांना या अहवालासंदर्भात दुसरे कन्सल्टेशन घेणे आवश्यक असताना त्यांनी ते सुद्धा केले नाही, असे डॉ. गुप्ता म्हणाले. सुशांतच्या पोस्टमार्टम रिपोर्टची फाईल मिळाल्यानंतर त्याची विस्तृत पडताळणी करण्यात कमीत कमी 3 दिवस लागतील, असेही डॉ. गुप्ता यांनी सांगितले.
फॉरेन्सिक टीमवर देखील शंका
फॉरेन्सिकने वेळेच्या बाबतीत गोळा केलेल्या पुराव्यांबाबत सीबीआयने शंका उपस्थित केली आहे. त्याचप्रमाणे फॉरेन्सिक टीमवर देखील शंका उपस्थित केली आहे. टाइम्स नाऊच्या एका वृत्तानुसार वेळेवर सुशांतचा लॅपटॉप आणि फोन फॉरेन्सिककडे पोहचवण्यात आला नाही. सुशांतच्या सर्व इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसबरोबर छेडछाड करण्यात आली आहे. 24 दिवसांनंतर सुशांतचा फोन फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी देण्यात आला.