सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला 4 महिने उलटले. पण अद्यापही सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. मात्र अद्यापही सीबीआयला कुठल्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचता आले नाही. अशात सुशांतचे चाहते आणि त्याचे कुटुंबीय सतत न्यायाची मागणी करत आहे. सोमवारी सुशांतच्या चाहत्यांनी पुन्हा एकदा न्यायाची मागणी लावून धरली आणि ट्विटरवर #CBITraceSSRKillers हा हॅशटॅग ट्रेंड झाला. या हॅशटॅगसह सुशांतच्यां चाहत्यांनी अभिनेत्याला न्याय मिळवून देण्याची मागणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रश्नांची सरबत्ती केली.
देशाच्या तरूणाईत मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी तुम्ही सुशांतला जनजागृती करण्याचे आवाहन केले होते. आता देशाची तरूणाई तुमच्याकडे सुशांतला न्याय मिळवून देण्याची मागणी करत आहे. सुशांतला न्याय मिळणार का? असा सवाल चाहत्यांनी पीएम मोदी यांना उद्देशून केला आहे.
गतवर्षी लोकसभा निवडणुकीपूर्वी मार्च महिन्यांत पीएम मोदी यांनी सुशांत सिंग राजपूत, कार्तिक आर्यन आणि क्रिती सॅनन या बॉलिवूड स्टार्सला तरूणाईला मतदानासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले होते. याच पार्श्वभूमीवर चाहत्यांनी सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी नवी मोहिम आरंभली आहे.
अनेकांनी यानिमित्ताने सीबीआय तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सीबीआय बनावट किल्ली, फेक सिम कार्ड्स, सीसीटीव्ही फुटेज याबद्दल का बोलत नाहीये? असा सवाल काही युजर्सनी केला आहे.
‘केदारनाथ’च्या पुर्नप्रदर्शनावर भडकले चाहते
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे काही महिन्यांपासून देशभरातील सिनेमा हॉल बंद करण्यात आले होते. मात्र, 15 ऑक्टोबरपासून सिनेमा हॉल सुरू करण्यात आले आहेत. मात्र या महिन्यात जुनेच सिनेमे प्रदर्शित करण्यात येत आहेत. त्यात सुशांतच्या ‘केदारनाथ’ सिनेमाचाही समावेस करण्यात आला आहे. मात्र यावर चाहते नाराज आहेत.‘ सुशांतच्या निधनाचा बाजार मांडून ठेवला आहे. त्याच्या नावार आता कित्येक निर्माते पैसे कमवतील. सुशांतची लोकप्रियता इनकॅश करण्यासाठी निर्माते काहीही करतील. पण रसिकही मुर्ख नाही,’ असे एका युजरने यावर लिहिले आहे. तर अन्य एकाने, ‘जेव्हा सुशांत जिवंत होता तेव्हा त्याच्या केदारनाथ सिनेमाला थिएटर मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला,’ अशा शब्दांत संताप व्यक्त केला होता.