बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूचं प्रकरण गेली अनेक वर्ष सातत्याने चर्चेत आहे. सुशांत सिंह राजपूत १४ जून २०२० रोजी रोजी वांद्रे येथील त्याच्या घरी मृतावस्थेत आढळला होता. नुकताच सीबीआयने या प्रकरणाबाबत अंतिम अहवाल सादर केला आहे. सुशांत सिंहचा मृत्यू ही आत्महत्याच असल्याचं सीबीआयच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे या प्रकरणात जिच्यावर संशय होता त्या रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty ) क्लीन चिट मिळाली आहे. रियाला क्लीन चीट मिळाल्यानंतर तिची मैत्रीण निधी हिरानंदानीने एका मुलाखतीत सुशांत आणि अभिनेत्रीबद्दल खुलासा केलाय.
निधी हिरानंदानीने इंडियन एक्सप्रेस स्क्रीनशी खास संवाद साधताना रिया आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या नात्यावर भाष्य केलं. ती म्हणाली, "ते जोडपे म्हणून खूप गोंडस होते, त्याच्यात एक सुंदर नातं होतं. दोघेही नेहमीच एकमेकांच्या सोबतीला होते". सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप झाल्यानंतर रियाच्या अवस्थेबद्दल निधी म्हणाली, "हे सर्व घडत असताना मी सतत रियाच्या संपर्कात होते. ती धक्क्यात होती. ती व्यवस्थित बसून शोकही करू शकत नव्हती".
रियावर आरोप झाल्यानंतर मीडियानं देखील तिचा प्रचंड पाठलाग केला होता. तिच्या प्रत्येक गोष्टींवर लक्ष ठेवलं जात होतं. जेव्हा रियाला पहिल्यांदा चौकशीसाठी बोलावलं होतं, त्या घटनेचा उल्लेख करत निधी म्हणाली, "चौकशीनंतर जेव्हा रिया बाहेर आली, तेव्हा सर्व पत्रकार तिच्यावर प्रश्नांचा भडीमार करत होते, माइक दाबत होते. घरी आल्यावर आम्ही पाहिलं की तिच्या हातावर आणि चेहऱ्यावर जखमा होत्या. तिला त्या अवस्थेत पाहून मला पूर्णपणे असहाय्य वाटत होतं. तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही".
निधी हिरानंदानीनेही रियाचा भाऊ शोविक या संपूर्ण घटनेने कसा बदलला हे सांगितलं. ती म्हणाली, "शोविक फक्त २३ वर्षांचा होता, तो त्याची CAT परीक्षा देत होता. त्याला सर्वोत्तम महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाला, पण तो जाऊ शकला नाही. दुसरीकडे, रियाचे करिअर बुडालं. ती कोणताही चित्रपट करू शकली नाही. तिच्याकडून खूप काही हिरावून घेतलं गेलं. केस सुरू असल्याने शोविकला बहुतेक कॉलेजांमध्ये प्रवेश मिळाला नाही".