वयाच्या 34 व्या वर्षी मृत्यूला कवटाळणा-या सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येने सगळीकडे शोकाचे वातावरण आहे. या वर्षी बॉलिवूडच्या अनेक बड्या स्टार्सनी जगाचा निरोप घेतला. या धक्क्यातून चाहते सावरत नाहीत तोच सुशांतने आत्महत्या केल्याची बातमी आली. सुशांतच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याची एक बहीण श्वेता सिंग किर्ती अमेरिकेत राहते. ती भावाला अखेरचे पाहू इच्छिते. पण अनेक तास प्रयत्न करूनही तिला फ्लाईटची तिकिट मिळाले नाही. अखेर तिने फेसबुकवर मदत मागितली.
‘मला लवकरात लवकर भारतात जायचे आहे. पण मला फ्लाईटचे तिकिट मिळत नाहीये. कुणीतरी माझी मदत करा, मला पर्याय सुचवा,’ असे तिने लिहिले. अनेक प्रयत्नानंतर श्वेताला तिकिट मिळाले. पण ते 16 तारखेचे आहे. म्हणजे उद्या श्वेता अमेरिकेतून निघेल. खरे तर भावाच्या अंत्यदर्शनासाठी श्वेता व्याकूळ आहे. तिच्या डोळ्यांतील अश्रू काही केल्या थांबत नाहीयेत. पण भावाचे अंत्यदर्शनही ती घेऊ शकणार नाही. ताज्या माहितीनुसार, आज 4 वाजता सुशांतवर मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यामुळे श्वेताला भावाचे अंत्यदर्शन घेता येणार नाही.
ताज्या माहितीनुसार, सुशांतवर पाटण्यात नाही तर मुंबईतच अंत्यसंस्कार होणार आहे. सुशांतवर पाटण्यात अंत्यसंस्कार व्हावेत, अशी त्याच्या कुटुंबाची इच्छा होती. पण देशभर कोरोनाचा प्रकोप बघता मुंबई पोलिसांनी सुशांतचे पार्थिव मुंबईवरून पाटण्यास नेण्यास परवानगी नाकारली.
सुशांतचे कुटुंब अंत्यसंस्कारासाठी मुंबईत पोहोचले आहे. कोरोना व्हायरसमुळे अंत्यसंस्कारात काही मोजक्या लोकांना सामील होण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सुशांतचे वडील, त्याच्या बहीणी व अन्य काही मोजके जवळचे नातेवाईक एवढेच त्याच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकतील.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत गेल्या काही महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये होता. याचमुळे त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.