Join us

सुशांतच्या आत्महत्येस कारण की...! शिवसेना नेते संजय राऊत यांचा अभिनेत्याच्या डिप्रेशनबद्दल खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 13:59 IST

पडद्यावरचा संभाव्य ‘जॉर्ज’ पडद्याआड गेला...

ठळक मुद्देसुशांतच्या आत्महत्येस अचानक ‘उत्सवी’ स्वरूप प्राप्त झाले. ही एक प्रकारची विकृती आहे, असे त्यांनी आपल्या या लेखात लिहिले आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला दोन आठवडे पूर्ण होत आहेत. पण त्याच्या मृत्यूचे कारण अद्यापही समोर आलेले नाही. सुशांतने डिप्रेशनमुळे आत्महत्या केली, असे मानले जात आहे. अशात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सुशांतच्या डिप्रेशनबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.दिवंगत अभिनेता सुशांतला आपण जॉर्ज फर्नांडिस यांच्या बायोपिकमध्ये घेण्याचा विचार करत होतो. पण सुशांतच्या डिप्रेशनमुळे हे शक्य झाले नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

रोखठोक या सदरात ‘सुशांतच्या आत्महत्येस कारण की’ या शीर्षकाचा लेख संजय राऊत यांनी लिहिला आहे. सुशांतसिंग राजपूतचे जाणे सगळ्यांनाच चटका लावून गेले. सुशांत अनंतात विलीन झाला. पण त्याच्या मृत्यूनंतर अनेक थंड पडलेले आत्मे जागे झाले आहेत. सुशांतची आत्महत्या दु:खद आहे. पण प्रत्येक आत्महत्या ही तितकीच दु:खद असते. मात्र सुशांतच्या आत्महत्येस अचानक ‘उत्सवी’ स्वरूप प्राप्त झाले. ही एक प्रकारची विकृती आहे, असे त्यांनी आपल्या या लेखात लिहिले आहे.याच लेखात पुढे त्यांनी सुशांतला जॉर्ज फर्नांडिस यांच्या बायोपिकमध्ये घेण्याची इच्छा होती, पण तो डिप्रेशनमध्ये आहे, असे मला सांगण्यात आले, असा खुलासा त्यांनी केला आहे.

ते लिहितात....

‘सुशांत राजपूत याने धोनी चित्रपटात महेंद्रसिंग धोनीची भूमिका केली. हा चित्रपट गाजला. त्याने आत्महत्या केली तेव्हा त्याचे सहा चित्रपट निर्मात्यांशी करार झाले होते. मी स्वत: या क्षेत्राशी काही प्रमाणात संबंधित आहे. ठाकरे चित्रपटाची निर्मिती संपल्यावर जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर बायोपिक करण्याचे ठरले. जॉर्ज यांची भूमिका करणारे चेहरे म्हणून ज्या दोन-तीन अभिनेत्यांची नावे समोर आली, त्यात सुशांतचे नाव होते. धोनीमुळे तो माझ्या नजरेत होता. पण दोन दिवसांनी मला सांगण्यात आले, सुशांत उत्तम अभिनेता आहे. ही भूमिका लीलया पेलेल. पण सध्या त्याची मानसिक अवस्था चांगली नाही. तो डिप्रेशनमध्ये आहे. चित्रपटाच्या सेटवर त्याचे वर्तन त-हेवाईक आहे. याचा सगळ्यांना त्रास होतो. अनेक मोठ्या प्रॉडक्शन हाऊसनी याच कारणांमुळे त्याच्याशी करार मोडले आहेत. सुशांतने स्वत:च स्वत:च्या करिअरची वाट लावली, असे जाणकारांचे सांगणे होते व त्यानंतर दोन महिन्यांत सुशांतच्या आत्महत्येची बातमी आली. त्यामुळे पडद्यावरचा संभाव्य ‘जॉर्ज’ पडद्याआड गेला.’

 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतसंजय राऊत