सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली़ त्याने आत्महत्या का केली, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे. मात्र काही लोकांच्या मते, बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून त्याने आयुष्य संपवले. त्याच्या मृत्यूनंतर लोकांमध्ये बॉलिवूडच्या एका गटाविरूद्ध संताप उफाळून आला आहे. विशेषत: करण जोहर, सलमान खान यांच्या कॅम्पविरोधात लोक संताप व्यक्त करत आहेत. बिहारमध्ये याचा प्रत्यय आला. सुशांतच्या संतापलेल्या चाहत्यांनी बिहारमध्ये सलमानच्या बीइंग ह्यूमनच्या शोरूममध्ये तोडफोड करत राडा घातला.
पाटण्यातील सलमानच्या या फॅशन स्टोर्सबाहेर शेकडो लोकांनी सलमानविरोधात नारेबाजी केली, त्याची पोस्टर्स फाडली.भाजपा युवा मोर्चाच्या एका माजी उपाध्यक्षाच्या नेतृत्वात अनेक जण बीइंग ह्यूमन च्या स्टोरमध्ये धडकले. यात बहुतांश तरूण होते. या सर्वांनी सलमान खान व करण जोहरविरोधात जोरदार नारेबाजी केली. पाटण्यात गेल्या तीन दिवसांपासून सलग सलमान व करणविरोधात निदर्शने सुरु आहेत़ याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
सुशांत पाटण्याचा होता. त्यामुळे त्याच्या आत्महत्येनंतर पाटण्यात लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सुशांतचे बॉलिवूडमधील करिअर जाणीवपूर्वक संपवले गेले. त्याला चित्रपट मिळू नयेत म्हणून प्रयत्न केले गेलेत. यामुळे नैराश्यात त्याने आत्महत्या केली, असा आरोप होत आहे.पाटण्यातील एका वकीलाने सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी करण जोहर, सलमान खान, संजय लीला भन्साळी, आलिया भट, एकता कपूर यांच्यासह 8 जणांविरोधात गुन्हाही दाखल केला आहे.
सोशल मीडियावरही बायकॉट करण जोहर, बायकॉट सलमान खान असे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. सलमान, करण जोहर, आलिया यांच्या फॉलोअर्सची संख्या वेगाने कमी होत आहे.