Sushant Singh Rajput Video : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतचं मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. 14 जून 2020 रोजी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत हे जग सोडून कायमचा निघून गेला. सुशांतच्या मृत्यूला दोन वर्षाहून अधिक काळ लोटला. पण सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे. सुशांतच्या कुटुंबीयांच्या मते, त्याची हत्या झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हे प्रकरण थंड पडलं होतं. पण आता पुन्हा एकदा या
प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. कूपर रूग्णालयात सुशांतच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करताना तिथे हजर असलेल्या एका कर्मचाऱ्याच्या खळबळजनक खुलाशानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा ऐरणीवर आलं आहे. कूपर हॉस्पीटलमध्ये सुशांतच्या मृतदेहाचं शवविच्छेदन झालं होतं. यावेळी हजर असलेले शवागार सेवक रूपकुमार शाह यांनी नुकताच एक खुलासा केला आहे. सुशांतचा मृतदेह बघून, ते आत्महत्येचे प्रकरण आहे, असं वाटलं नव्हतं. सुशांतच्या शरीरावर अनेक खुणा होत्या. त्याची 101 टक्के आत्महत्या नव्हती, असं रूपकुमार यांनी म्हटलं आहे. अशात सोशल मीडियावर सुशांतचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
हा सुशांतचा शेवटचा व्हिडीओ असल्याचा दावा युजर करत आहेत. अर्थात हा व्हिडीओ खरंच सुशांतच्या अंतिम दिवसातला आहे, याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही.
व्हिडीओत सुशांतची अवस्था अतिशय वाईट दिसतेय. तो आजारी, काहीसा विमनस्क दिसतोय. व्हिडीओतील सुशांतची अवस्था चाहत्यांसाठीही धक्कादायक आहे. सुशांतचा हा व्हिडीओ पाहून सगळेच भावुक झाले आहेत.सुशांत मुंंबईतील आपल्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता. सुरूवातीला सुशांतने आत्महत्या असल्याचं सांगितलं गेलं होतं. पण नंतर सुशांतच्या वडिलांनी आपल्या मुलाची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला होता. त्यांनी सुशांतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्ती हिच्यावर आत्महत्येसाठी उकसवणे, पैसे उकळणे असे गंभीर आरोप केले होते.