सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला महिनाभरापेक्षा अधिक काळ लोटलाय. 14 जूनला सुशांतचा मृतदेह त्याच्या मुंबईतील राहत्या घरी गळफास लावलेल्या अवस्थेत सापडला होता. सुशांतने आत्महत्या का केली, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहेत. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सुशांतच्या मृत्यूच्या दु:खातून अद्यापही चाहते सावरलेले नाहीत. अशात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुशांतच्या जाण्याचे दु:ख अनावर झालेल्या एका 13 वर्षीय मुलीने आत्महत्या करून स्वत:ला संपवले.
छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील या 13 वर्षीय मुलीने गळफास लावू आत्महत्या केली. आयुष्य संपवण्यापूर्वी तिने दोन ओळींची सुसाईड नोटही लिहिली. सुशांत या जगातून गेल्याने चांगले वाटत नाहीये. म्हणून आत्महत्या करतेय, असे तिने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. बुधवारी ही घटना घडली.
तिच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर ती प्रचंड दु:खी राहू लागली होती. आत्महत्येच्या दिवशी तिने टीव्हीवर सुशांतच्या ‘छिछोरे’ हा सिनेमा पाहिला आणि त्यानंतर तिचा मृतदेहच छताला लटकलेला सापडला. तिच्या या अनपेक्षित कृत्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.या मुलीने आत्महत्या केली त्यावेळी तिचे वडिल कामानिमित्त बाहेर गेले होते. तिचे वडील एका खासगी कंपनीत नोकरी करतात. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.