Join us

मर्डर बाय फिल्म इंडस्ट्री! सुशांत सिंग राजपूतने 6 महिन्यात गमावले होते 7 सिनेमे!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 11:56 AM

काल कंगना राणौतने सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीवर मोठे आरोप केले होते. आता सुशांतच्या फिल्म इंडस्ट्रीतील अनेक मित्रांनीही बॉलिवूडमधील इंडस्ट्रीतील वाढत्या घराणेशाहीवर प्रहार केला आहे.

ठळक मुद्दे  सोशल मीडियावर बॉलिवूड क्लब, गेट कीपर्स आॅफ बॉलिवूड, डबल फेक, हिपोक्रेटिक असे हॅशटॅग ट्रेंड करत आहेत.

सुशांत सिंग राजपूत सारख्या गुणी अभिनेत्याची आत्महत्या सर्वांच्याच मनाला चटका लावून गेलीय. त्याच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये नव्या वादाला तोंड फोडले आहे. काल अभिनेत्री कंगना राणौतने सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीवर मोठे आरोप केले होते. त्याची आत्महत्या नाही तर प्लान मर्डर होता, असे ती म्हणाली होती. सुशांतच्या मृत्यूला बॉलिवूडमधील माफियाशाही जबाबदार आहे. इंडस्ट्रीने त्याला कायम डावलले असे ती म्हणाली होती. आता कंगनाच्या या टीकेनंतर सुशांतच्या फिल्म इंडस्ट्रीतील अनेक मित्रांनीही बॉलिवूडमधील इंडस्ट्रीतील वाढत्या घराणेशाहीवर प्रहार केला आहे. केवळ इतकेच नाही तर माजी खासदार संजय निरूपम यांनीही बॉलिवूडमधील घराणेशाहीवर सवाल उपस्थित केले आहेत.  सोशल मीडियावर बॉलिवूड क्लब, गेट कीपर्स आॅफ बॉलिवूड, डबल फेक, हिपोक्रेटिक असे हॅशटॅग ट्रेंड करत आहेत.

सुशांतने 6 महिन्यांत गमावले 7 सिनेमे

काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी सुशांतच्या मृत्यूनंतर एक ट्विट केले. ‘छिछोरे या सिनेमानंतर सुशांतने 7 सिनेमे साइन केले होते. मात्र सहा महिन्यांतच त्याच्या हातून हे सर्व सिनेमे काढून घेण्यात आलेत. का? फिल्म इंडस्ट्रीतील कौर्य वेगळ्या लेवलवर काम करते. याच कौर्याने एका प्रतिभावान कलाकाराचा बळी घेतला,’ असे निरूपम यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.

शेखर कपूर म्हणाले, ते त्यांचे कर्म...

दिग्दर्शक शेखर कपूर यांनी बॉलिवूडमधील नेपोटिझमवर सवाल केलेत. ‘मला माहितीये तू कुठल्या दु:खातून जात होतास ते. मी त्या लोकांना चांगले ओळखतो ज्यांच्यामुळे तू माझ्या खांद्यावर डोके ठेवून रडला होतास. मी गेल्या सहा महिन्यांत तुझ्यासोबत असायला हवे होते. काश, तू माझ्याकडे आला असतास. जे तुझ्यासोबत झाले, ते त्या लोकांचे कर्म आहे तुझे नाही,’ असे त्यांनी म्हटले आहे.

अनुभव सिन्हा म्हणाले,

दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनीही सुशांतच्या मृत्यूसाठी इंडस्ट्रीला जबाबदार ठरवले. ‘बॉलिवूडच्या प्रीव्हिलेज क्लबला आज रात्री बसून गंभीरपणे विचार करायला हवा. आता ते मला फार खोलात जावून काही सांगायला म्हणणार नाहीत,’ अशा खोचक शब्दांत त्यांनी बॉलिवूडमधील नेपोटिझवर प्रहार केला.

सपना भवनानी लिहिते,

सुशांत गेल्या काही महिन्यांपासून तणावात होता, यात काहीही शंका नाही. इंडस्ट्रीतील एकही व्यक्ती त्याच्यासाठी उभा झाला नाही, ना कुणी त्याची मदत केली. बॉलिवूड किती बनावटी आहे, हे त्याच्या मृत्यूवरच्या पोस्ट पाहून लक्षात येते. येथे कोणी तुमचा मित्र नाही, असे हेअरस्टाइलिस्ट सपनाने लिहिले.

निखिल द्विवेदीही बरसले

उगवत्या सूर्याला प्रणाम करत असाल तर त्यावर आक्षेप नाही.  ही जगाची रीत आहे. पण आक्षेप यावर आहे की, ज्या उगवत्या सूर्याकडून तुम्ही प्रकाश घेतलाय तोच सूर्य बुडत असताना तुम्ही नजरानजर टाळता. त्याची खिल्ली उडवता. एकमेकांच्या संपर्कात राहण्याचे तर बोलूच नका. काय तुम्ही अभय देओल, इमरान खानच्या संपर्कात आहात? त्यांचे करिअर चमकत असते तर तुम्ही त्यांच्या मागेपुढे फिरला असता, असे निखिल द्विवेदी यांनी लिहिले.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतबॉलिवूड