अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या अकस्मात मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला. अजूनही सुशांतच्या मृत्यूचं कोडं उलगडलं नाहीय. फॅन्स ट्विटरवर अनेकदा सुशांतला न्याय मिळवून देण्याची मागणी करत असतात. सुशांतच्या मृत्यूला ४ वर्ष पूर्ण होणार आहेत. अशातच भावाच्या आठवणीत सुशांतची बहिण केदारनाथ धाम यात्रेला गेली आहे. तिथे गेल्यावर फोटो शेअर करत सुशांतची बहिण श्वेताने फोटो आणि कॅप्शन लिहित भावूक आठवण सांगितली आहे.
सुशांतच्या बहिणीची भावूक पोस्ट
सुशांतच्या बहिणीने खास फोटो शेअर केले आहेत. यात ती केदारनाथला ध्यानमग्न दिसत आहे. याशिवाय जेव्हा सुशांत केदारनाथला गेला होता तिथले फोटोही श्वेताने शेअर केलेत. हे फोटो शेअर करत सुशांतची बहिण लिहिते, "आज १ तारीख आहे आणि चार वर्षांपुर्वी याच महिन्यातील 14 तारखेला आपण सर्वांनी सुशांतच्या प्रेमाला गमावलं. आताही त्या दुःखद दिवशी काय घडले याची उत्तरे आम्ही शोधत आहोत. मी केदारनाथला प्रार्थना करण्यासाठी आणि भाईशी जवळीक साधण्यासाठी आले. दिवस कमालीचा भावनिक होता; केदारनाथला उतरताच माझ्या डोळ्यात पाणी आलं."
सुशांतच्या बहिणीने पुढे लिहिलं, "मी थोडावेळ चालले पण शेवटी खाली बसून मी भावूक झाले. माझ्या आजूबाजूला त्याची उपस्थिती जाणवली. मला त्याला मिठी मारण्याची जबरदस्त इच्छा जाणवली. सुशांतने जिथे ध्यान केले होते तिथे बसून मी ध्यान केले. त्या क्षणी मला वाटले की, तो अजूनही माझ्याबरोबर आहे, माझ्या आत आहे, माझ्याद्वारे जगत आहे. पुढे इंस्टाग्राममध्ये माझ्या फीडमध्ये फक्त एक पोस्ट दिसली ती म्हणजे केदारनाथमध्ये साधूसोबत भाईचा फोटो. मला त्या साधूला भेटायचे होते आणि देवाच्या कृपेने मी त्यांना भेटले." अशाप्रकारे सुशांतचा फोटो शेअर करुन त्याच्या बहिणीने साधूसोबतचं खास कनेक्शन जोडलंय.