अभिनेता सुशांत सिंग राजपूतने (Sushant Singh Rajput ) 14 जून 2020 रोजी आपल्या राहत्या घरी कथितरित्या गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मात्र त्याच्या कुटुंबीयांनी सुशांतची आत्महत्या नसून त्याची हत्या झाल्याचा आरोप केला होता. आता हे प्रकरण पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलं आहे. कारण ठरलं, सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करणाऱ्या टीममधील एका कर्मचाऱ्याचा खुलासा. होय, सुशांतच्या पोस्टमार्टमवेळी तिथे उपस्थित असलेले शवागार सेवक रूपकुमार शाह यांनी एक मोठा खुलासा केला आहे. सुशांतची आत्महत्या नसून ती 101 टक्के हत्याच होती, असं त्यांनी म्हटलं आहे. रूपकुमार शाह यांच्या या दाव्यानंतर आता सुशांतच्या बहिणीची प्रतिक्रिया समोर आली आहे.
कूपर हॉस्पिटलचे शवागार सेवक रूपकुमार शाह यांच्या खळबळजनक खुलाशानंतर सुशांतची बहीण श्वेता सिंग किर्तीने प्रतिक्रिया दिली आहे. श्वेताने सोशल मीडियावर रूपकुमार शाह यांना सुरक्षा पुरवण्याचे आवाहन केलं आहे. ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनाही टॅग केलं आहे.
‘या पुराव्यात (रूपकुमार शाह यांच्या दाव्यात) एक टक्काही सत्यता असेल तर आम्ही सीबीआयला या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करण्याची विनंती करतो. आपण या प्रकरणाची नि:पक्षपातीपणे चौकशी करून सत्य काय आहे ते बाहेर काढाल, असा आमचा नेहमीच विश्वास आहे. आम्हाला त्याच्यासोबत नक्की काय घडलं हे जाणून घ्यायचं आहे, असं ट्विट श्वेताने केलं आहे.
14 जून 2020 रोजी सुशांत सिंग राजपूत त्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. त्यानंतर श्वेताने भाऊ सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी दीर्घ लढा दिला, जो अजूनही सुरू आहे. या प्रकरणात सुशांतला न्याय मिळण्याची फारशी आशा नव्हती, मात्र रूपकुमार शाहच्या दाव्यानंतर सुशांतला आता न्याय मिळू शकेल, अशी आशा सुशांतच्या कुटुंबीयांना व चाहत्यांना वाटत आहे. रूपकुमार शाह यांचा खुलासा...‘सुशांतच्या मृतदेहावर मुका मार लागल्याच्या खूणा होत्या. हा मृतदेह आत्महत्येचा नसून हत्येचा असल्याचं वरिष्ठांना सांगितलं परंतु माझं काम मी करतो, तुझं काम तू कर, असं मला सांगण्यात आलं. माझं काम केवळ पोस्टमोर्टम करणं आणि मृतदेह शिवणं हेच होते. दीड दोन तास पोस्टमोर्टम झालं. त्याची व्हिडिओग्राफी केली नाही फक्त फोटोग्राफी केली गेली. सुशांत सिंग राजपूत हा खूप मोठा अभिनेता होता. त्याच्यासारख्या माणसाने आत्महत्या केल्यानं याकडे निरखून बघणं आमचं काम आहे. मी 28 वर्षात 50-60 मृतदेहाचं पोस्टमोर्टम केलं आहे. सुशांतचा मृतदेह पाहिल्यावर ही हत्या असल्याचं दिसलं. हातापायाला मार लागलेला माणूस गळफास लावून घेऊ शकत नाही. सुशांतने आत्महत्या केली असावी हे मला पटलं नाही. मृत्यू संशयास्पद असल्याचं मृतदेहाच्या पोस्टमोर्टमवेळी व्हिडिओग्राफी केली जाते. सुशांतच्या मृतदेहाचं पोस्टमोर्टम करण्यावेळी पूर्णवेळ मी तिथेच होतो. पोस्टमोर्टमवेळी 2 महिला आणि 3 पुरुष डॉक्टर होते. आमच्यात संभाषण झालं होतं. ही हत्या असल्याची चर्चा झाली होती. तेव्हा तुम्ही तुमचं पोस्टमोर्टमचं काम करा. आम्ही अहवाल बनवतो असं डॉक्टरांनी म्हटलं. त्याप्रमाणे आम्ही मृतदेहावर पोस्टमोर्टम केलं. जे काही नमुने होते ते पोलिसांकडे सुपूर्द केले, असं रुपकुमार शाह यांनी टीव्ही 9 ला दिलेल्या मुलाखतीत अलीकडे सांगितलं होतं.
सुशांत सिंग राजपूत या निरापराध जीवाला न्याय मिळावा हीच आमची इच्छा आहे. 101 टक्के ही आत्महत्या नसून हत्याच होती. तुम्ही सुशांतचा मृतदेह निरखून पाहिला तर हे दिसून येईल. प्रत्येक माणसाला स्वत:च्या जीवाची काळजी असते. आज माझं 60 वर्ष वय आहे. माझं कुटुंब आहे. माझाही मृतदेह तिथेच आला तर काय, मी आजही घाबरलेल्या अवस्थेत आहे. आता मुख्यमंत्री या प्रकरणावर लक्ष देऊन आहेत त्यामुळे मी पुढे येऊन बोलत आहे. मी नाव घेऊन सांगू शकत नाही. पण बाहेर कुठलीही वाच्यता करू नका, असं मला सांगण्यात आलं होतं. सुशांत सिंग राजपूतला न्याय मिळावा यासाठी मी पुढे आलोय, असंही रुपकुमार शाह यांनी म्हटलं होतं.