Join us

"CCTV बंद होते, बेडरुमची चावी गायब होती आणि...", सुशांतच्या मृत्यूच्या ४ वर्षांनंतर बहिणीचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 1:51 PM

"सुशांतला नक्कीच काहीतरी माहीत होतं", अभिनेत्याच्या बहिणीचा खुलासा, म्हणाली, "सीबीआयने..."

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा करोनाच्या काळात मृत्यू झाला. १४ जून २०२० रोजी त्याचा मृतदेह बेडरुममधील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मिळाला होता. सुशांतच्या मृत्यूने बॉलिवूडमध्ये खळबळ माजली होती. त्याच्या मृत्यूबाबत शंकाही व्यक्त करण्यात येत होत्या. सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला गेला होता. याप्रकरणी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची चौकशीही करण्यात आली होती. पण, चार वर्षांनंतरही यामागचं नेमकं सत्य अद्याप समोर आलेलं नसल्याचं सुशांतची बहीण श्वेता सिंहचं म्हणणं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सुशांतच्या बहिणीने याबाबत भाष्य केलं आहे.  श्वेता सिंहने नुकतीच युट्यूबर रणवीरच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. ती म्हणाली, "मला सुशांतच्या फ्लॅटमध्येही जाऊ दिलं नाही. मी याचा तपास करू शकत नाही. त्यामुळे सीबीआयने सांगावं की नेमकं काय घडलं आहे. सीबीआय ही देशातील सर्वात चांगली तपासणी करणारी संस्था आहे. त्यांनी यामागचा शोध घेतला पाहिजे. प्रत्येक छोट्या गोष्टीची माहिती त्यांना दिली गेली आहे. त्यामुळे काय झालं होतं? हे ते नक्कीच शोधू शकतील, असं मला वाटतं. सुशांतच्या अपार्टमेंट आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा बंद होते. असं का? सुशांत त्याच्या बेडरुमचा दरवाजा कधीच लॉक करत नव्हता. त्यादिवशी त्याने रुमचा दरवाजा लॉक केला होता. जेव्हा अपार्टमेंटच्या चाव्या मिळाल्या. तेव्हा त्यामध्ये बेडरुमची चावी नव्हती. ती चावी कुठे गेली? यासगळ्या गोष्टी समजण्यापलिकडे आहेत." 

"जर सुशांतने आत्महत्या केली असेल तर तसं सांगा. त्याने आत्महत्या का केली, यामागचं कारण सांगा. आम्ही त्यावर विश्वास ठेवू. पण, जर हत्या झाली असेल. तर तेदेखील सांगितलं पाहिजे.  सुशांतला नक्कीच काहीतरी माहीत होतं. दिशा सालियनच्या मृत्यूनंतर सुशांत म्हणाला होता की हे लोक मला पण सोडणार नाहीत," असंही पुढे सुशांतच्या बहिणीने सांगितलं. 

सुशांत 'पवित्र रिश्ता' या मालिकेमुळे घराघरात पोहोचला होता. त्याने 'काय पो छे' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 'एम.एस.धोनी : द अनटोल्ड स्टोरी', 'छिछोरे','राबता', 'केदारनाथ' अशा सुपरहिट सिनेमांतून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. दिल बेचारा हा त्याचा शेवटचा सिनेमा ठरला. त्याच्या मृत्यूनंतर २०२०मध्ये हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता. 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतसेलिब्रिटी