सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असताना काल मंगळवारी मुंबई पोलिसांनी ‘दिल बेचारा’ या चित्रपटाची अभिनेत्री संजना सांघी हिची चौकशी केली होती. ‘दिल बेचारा’ हा सुशांतचा शेवटचा सिनेमा होता. या चित्रपटाच्या सेटवर सुशांत व संजना यांच्या बिनसल्याची बातमी आली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संजनाची तब्बल 9 तास चौकशी केली. या चौकशीत संजनाने सुशांतवर लावलेल्या मी टू आरोपांसह, सुशांतच्या डिपे्रशनसंदर्भात अनेक प्रश्न संजनाला केले गेलेत. यावर संजनाने अनेक खुलासे केल्याचे कळते.अभिनेत्री संजाना सांघीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 2018 मध्ये ‘दिल बेचारा’साठी तिची ऑडिशनच्या माध्यमातून निवड झाली होती. यानंतर सुशांत आपला हिरो असल्याचे तिला कळले होते. सिनेमाच्या सेटवरच यानंतर दोघांचीही पहिली भेट झाली होती.
मीटू आरोपाबद्दल केला खुलासा,
संजनाने पोलिसांनी सांगितले की, मी सुशांतवर कोणत्याही प्रकारचे मीटू संबंधी आरोप लावले नव्हते किंवा तिच्यासोबत प्रत्यक्षात अशी कोणतीही घटना घडली नव्हती. 2018 मध्ये मी टू चळवळ सुरू होती त्यावेळी कोणीतरी अफवा पसरवली होती. सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान सुशांतच्या ‘ओव्हर फ्रेन्डली’ स्वभावाला कंटाळून मी त्याच्यावर आरोप केल्याची चर्चा कुठून सुरू झाली मला माहित नाही. कारण मी त्यावेळी भारतात नव्हते. मी माझ्या आईसोबत व्हेकेशनसाठी युएसला गेले होते. मला याबाबत कोणतीच माहिती नव्हती.
तिने पुढे सांगितले. ‘सिनेमाचे पहिले शेड्युल पूर्ण झाले होते आणि दुस-या शेड्युल पर्यंत माझ्याकडे बराच वेळ होता म्हणून मी आईसोबत फिरायला गेले. माझ्या नावाने सुशांतवर असे आरोप केले जात आहेत, याची मला कल्पनाही नव्हती. भारतात परतल्यावर मला या सर्व गोष्टी कळल्या. त्यावेळी मी सोशल मीडियावर या सगळ्या अफवा असल्याचा खुलासाही केला होता. यानंतर मी आणि सुशांत चित्रपटाचे दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांना भेटलो. या घटनेमुळे सुशांत डिप्रेशनमध्ये गेला होता. मला बदनाम करण्यासाठी हा कोणीतरी कट रचला आहे आणि त्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे, असे तो म्हणाला होता. सुशांतने त्यावेळी आमच्या दोघांच्या संभाषणाचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केले होते आणि माझी त्याने त्याबाबत माफी सुद्धा मागितली होती. मी त्यावेळी युएस. ला असल्याने त्याचा माझा काहीच संपर्क होत नव्हता आणि अशा परिस्थितीत त्याच्याकडे स्वत:वरील आरोप खोटे आहेत हे सिद्ध करण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्याने आमच्या संभाषणाचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केले होते आणि मला त्याबाबत कोणतीही समस्या नव्हती कारण त्याच्यावर झालेले आरोप हे खोटे होते. त्या केवळ अफवा होत्या .
शूटींगदरम्यान अगदी सामान्य होता सुशांत...संजना सांघीच्या म्हणण्यानुसार, सुशांत संपूर्ण शूटिंगच्या दरम्यान सामान्य होता. तो एक शांत डोक्याचा माणूस होता. त्याच्या पर्सनल लाइफ बद्दल तो कोणासोबतच काहीही शेअर करत नव्हता. त्याच्या कुटुंबायांचे विनोदी किस्से आमच्या सर्वांसोबत शेअर करत असे. माझे आणि सुशांतचे बोलणे, भेटणे केवळ सिनेमापुरते होत असे. तो अनेकदा मला चांगले सल्ले देत असे आणि मोटीव्हेट करत असे.