Join us

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण, नोकराने केला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 3:58 PM

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात सतत नवीन खुलासे होत आहेत. यादरम्यान सुशांतच्या नोकराने धक्कादायक खुलासा केला आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात सतत नवीन खुलासे होत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुशांतच्या नोकराने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार रात्री कोणतीही पार्टी झालेली नाही. बिहार पोलिसांनी सुशांतच्या नोकराची चौकशी केली त्यावेळी त्याने स्पष्ट सांगितले की आत्महत्येच्या आदल्या रात्री सुशांतच्या घरी कोणतीही पार्टी झाली नव्हती.सुशांतच्या नोकराने बिहार पोलिसांना सांगितले की, १३ जून रोजी रात्री जेवण करुन सुशांत त्याच्या बेडरुममध्येच होता. १४ जून रोजी सुशांतला दररोजाप्रमाणे पहाटे उठला. त्या रात्री तो बाहेर गेला नाही ना घरी कुठली पार्टी झाली. यापूर्वी मुंबई पोलिसांनीही पार्टी झाली नसल्याचे अधिकृतपणे नाकारले होते. सुशांतच्या कॉल डिटेलवरून मिळालेल्या माहितीनुसार, सुशांतने रात्री उशिरा दोन वाजताच्या सुमारास दोन फोन केले होते ते म्हणजे रिया चक्रवर्ती आणि तिचा मित्र महेश शेट्टी यांना. मात्र, त्यांनी हे फोन कॉल उचलले नव्हते. त्यामुळे त्या रात्री दोघांशीही त्याचे संभाषण होऊ शकले नाही.

आजतकच्या रिपोर्टनुसार, सुशांत सिंग राजपूत याचा मित्र सिद्धार्थ पठानी याने वांद्रे पोलिसांना एक ईमेल केला आहे. त्यात सुशांतचे कुटुंबीय आपल्यावर रियाविरुद्ध खोटी जबानी देण्यासाठी दबाव टाकत असल्याचे म्हटले आहे. हा ईमेल वांद्रे पोलिसांना 28 जुलै रोजी मिळाला आहे. ईमेलमध्ये नमूद केल्यानुसार, सिद्धार्थला 22 जुलै रोजी एक कॉन्फरन्स कॉल आला होता. त्यात सुशांतचे मेहुणे, आयपीएस अधिकारी ओ. पी. सिंह, मीतू सिंग आणि एक चौथी व्यक्तीही होती. या कॉलमध्ये सिद्धार्थला सुशांतसोबत माऊंट ब्लँक सोसायटीत एका घरात राहत असताना रिया आणि सुशांत यांच्या खर्चांविषयी विचारणा करण्यात आली. हा कॉल 40 सेकंदात कट करण्यात आला आणि त्याची कोणतेही स्टेटमेंट नोंदवण्यात आले नाही, असे सिद्धार्थचे म्हणणे आहे.

त्यानंतर 27 जुलै रोजी सिद्धार्थला पुन्हा ओ.पी. सिंह याचा फोन आला. त्यांनी सिद्धार्थला बिहार पोलिसांना रियाविरुद्ध खोटी साक्ष देण्याविषयी सांगितले. तसेच त्याला पुन्हा एक कॉल आला. तो कॉल नीलोप्तल मृणाल नावाच्या व्यक्तीचा होता. ही व्यक्ती तीच आहे, जी बिहार पोलिसांसोबत दिसली होती. माझ्यावर अशा काही घटनांविषयी सांगण्यास दबाव आणला जात आहे, ज्याविषयी मला काहीच माहीत नाही, असे सिद्धार्थने ईमेलमध्ये म्हटले आहे.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्ती