पाटणा : अभिनेता मुलगा सुशांतसिंह राजपूत याने मुंबईत आत्महत्या केल्याचे समजल्यावर त्याचे वडील कृष्णकुमार सिंह यांची तर शुद्धच हरपली. कृष्णकुमारसिंह यांची प्रकृती खालावली असून, ते बोलण्याच्याही अवस्थेत नाहीत, असे समजते.सुशांतचे वडील येथील राजीवनगर कॉलनीत राहतात. सुशांत सिंहच्या आत्महत्येचे वृत्त समजताच फार मोठा जमाव त्याच्या वडिलांच्या घरी जमला. सुशांतने आत्महत्या केल्याचे त्यांना फोनवर समजल्यावर ते कोसळलेच. सुशांतच्या मागे त्याचे वडील आणि चार बहिणी आहेत.सुशांत सिंह हा मूळचा बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील बध्रा कोठीतील मालदिहाचा. सुशांत शेवटचा या खेड्यात आला होता तो कुटुंबाच्या एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी. सुशांत सिंहने आत्महत्या केली यावर अजूनही पाटण्यातील लोकांचा विश्वास नाही. अगदी काहीच महिन्यांपूर्वी सुशांत खगादिया जिल्ह्यातील खेड्यात आजोळी कौटुंबिक कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आला होता. सुशांतचे बालपण पाटण्यात गेले. त्याचे घर राजीवनगरमध्ये. तो क्रिकेट मोठ्या आवडीने मित्रांसोबत रस्त्यांवरही खेळायचा. त्याने ‘एमएस धोनी’, ‘द अनटोल्ड स्टोरी’,‘छिछोरे’ अशा अनेक चित्रपटांत काम केले. त्याचे प्रारंभीचे शिक्षण पाटण्यातील सेंट कैर्न्स हायस्कूलमध्ये झाले. त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण दिल्ली कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमधून पूर्ण केले.पाटण्यातील सुशांत सिंहच्या घराची देखभाल करणाऱ्या लक्ष्मी देवी म्हणाल्या की, ‘‘सुशांत काहीच दिवसांपूर्वी त्याच्या वडिलांशी बोलला होता व मी पाटण्याला येऊन तुम्हाला डोंगरावर चालायला घेऊन जाईन, असे म्हणाला होता; परंतु तो आला नाही; पण त्याऐवजी त्याच्या मृत्यूची बातमी आली.’’