सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी रोज वेगवेगळे आरोप होत असताना आता सुशांतच्या कुटुंबाने एक 9 पानांचे पत्र प्रसिद्ध केले आहे. या पत्रात सुशांतच्या कुटुंबाने धमक्या मिळत असल्याचा आरोप केला आहे. सुशांतचे वृद्ध वडिल आणि चार बहिणींना धडा शिकवू अशा धमक्या मिळत आहेत, प्रत्येकाच्या चारित्र्यावर चिखलफेक केली जात आहे, असे सुशांतच्या कुटुंबाने या पत्रात म्हटले आहे.
पत्रात काय आहे ?तू इधर-उधर की ना बात कर ये बता कि काफिला क्यूं लुटा, मुझे रहजनों से गिला नहीं तेरी रहबरी का सवाल है...या फिराक जलालपुरी यांच्या एका शायरीने पत्राची सुरुवात केली गेली आहे.पुढे पत्रात लिहिलेय, ‘प्रसिद्धीसाठी अनेक बनावटी, ढोंगी मित्र, भाऊ, मामा मनात येईल ते बोलत आहेत. सुशांतचे कुटुंब असण्याचा काय अर्थ आहे, हे सांगणे त्यामुळेच गरजेचे झाले आहे.
सुशांतचे आईवडिल कष्टाची भाकर कमावून खाणारे लोक होते. पाच आनंदी हसती-खेळती मुलं होती. त्यांना योग्य संस्कार, संधी मिळाव्यात म्हणून 90 च्या दशकात आईवडील गाव सोडून शहरात आले होते. घर आणि मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले. पहिल्या मुलीत जादू होती. कोणी आले आणि हळूच तिला परिकल्पनेतील देशात घेऊन गेला. दुसरी राष्ट्रीय टीमसाठी क्रिकेट खेळली. तिसरीने कायद्याचे शिक्षण घेतले आणि चौथीने फॅशन डिझाईनमध्ये डिप्लोमा घेतला. पाचवा सुशांत होता. सुशांतच्या कुटुंबाने ना कुणाकडून काही घेतले, ना मदत मागितली... ’
‘सुशांतचे कुटुंब, ज्यात चार बहिणी आणि एक वृद्ध वडील आहेत या सर्वांना धडा शिकवण्याची धमकी मिळत आहेत. सर्वांच्या चारित्र्यावर चिखलफेक होत आहे. सुशांतचे त्याच्या कुटुंबासोबत त्याचे संबंध चांगले नव्हते, असे आरोप होत आहेत. तमाशा करणारे आणि तमाशा पहणाºयांनी हे विसरू नये की, ते सुद्धा इथेच राहणार आहेत. उद्या त्यांच्यासोबतही असे घडू शकते, हे कोणी विसरू नये. जिथे स्वत:ला शक्तीशाली समजणारे लोक कष्टकºयांना मारतात आणि सुरक्षेच्या नावावर पगार घेणारे खुलेआम त्यांची पाठराखण करतात, या दिशेने आपण देशाला का नेतो आहोत?,’ असा सवालही सुशांतच्या कुटुंबाने या पत्रात केला आहे.