बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita sen) सध्या तिच्या 'ताली' या वेब सीरिजमुळे चर्चेत येत आहे. गौरी सावंत (gauri sawant) यांच्या जीवनावर आधारित ही सीरिज १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत असून सुष्मिता यात मुख्य भूमिका साकारत आहेत. तृतीयपंथी असलेल्या गौरी सावंत यांच्या जीवनातील अनेक चढउतार या सीरिजमधून उलगडले जाणार आहेत. सध्या सुष्मिता या सीरिजचं जोरदार प्रमोशन करत असून एका मुलाखतीमध्ये तिने तृतीयपंथियांनी ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे. इतकंच नाही तर अशा काही ट्रोलर्सला तिने ब्लॉकही केलं आहे.
अलिकडेच सुष्मिताने 'न्यूज १८' ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने ताली सीरिजला ट्रोल करणाऱ्यांना, त्यावर नकारात्मक कमेंट करणाऱ्यांना सुनावलं आहे. अनेकांनी तालीच्या पोस्टवर कमेंट करत छक्का असं म्हटलं आहे. ही गोष्ट सुष्मिताला प्रचंड खटकली असून तिने यावर भाष्य केलं आहे.
"गौरी सावंतची भूमिका साकारल्यामुळे मला खऱ्या आयुष्यात असं काही सहन करावं लागतंय जे माझ्या सहनशक्तीच्या पलिकडे आहे. म्हणजे, खऱ्या गौरीला तिच्या आयुष्यात किती सहन करावं लागलं असेल. इतकी वर्ष ती या सगळ्या गोष्टी सबन करत आयुष्य जगतीये", असं सुष्मिता म्हणाली.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुष्मिता सातत्याने चर्चेत येत आहे. मध्यंतरी ललित मोदींसोबतच्या रिलेशनमुळेही ती चर्चेत येत होती. या चर्चांवरही तिने मौन सोडलं. झूमला तिने मुलाखत दिली. यावेळी 'आपलं नाव तेव्हाच खराब होते जेव्हा आपण ते स्वत: ला लावून घेतो. मी असं काही स्वत: ला लावून घेतलं नाही. त्यामुळे या कोणत्याच गोष्टी मला लागू झाल्या नाहीत. मी सध्या सिंगल आहे आणि याविषयी कोणाला काही वाटायला नको,' असं म्हणत तिने या चर्चांना पूर्णविराम दिला.