प्रसिद्ध सेलिब्रिटी फॅशन डिझायनर शरबरी दत्ता यांचे वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले आहे. कोलकाता येथील त्यांच्या निवासस्थानी त्या मृतावस्थेत आढळून आल्या. बाथरुममध्ये त्यांचा मृतदेह आढळल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. अद्याप त्यांच्या मृत्यूचे कारण समोर आलेले नाही.
शरबरी दत्ता कोलकाता येथील ब्रॉड स्ट्रीट येथील निवासस्थानी एकट्याच राहत होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. दरम्यान त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या अहवालातूनच दत्ता यांच्या निधनाचे नेमके कारण समोर येईल.
शरबरी दत्ता या सुप्रसिद्ध बंगाली कवी अजित दत्ता यांच्या कन्या आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून त्या फॅशन डिझायनिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. डिझायनर पंजाबी कुर्ता आणि पुरुषांसाठी रंगीत बंगाली धोतराचा ट्रेंड पहिल्यांदा शरबरी यांनीच फॅशन जगतात आणल्याचे सांगितले जाते. पुरुषांसाठीच्या एथनिक वेअर प्रकारच्या डिझाइन्ससाठी त्यांची वेगळी ओळख होती. शरबरी यांचा मुलगा अमलीन दत्ता हासुद्धा एक फॅशन डिझायनर आहे.