Join us

'हमको मन की शक्ती देना' फेम गायिका वाणी जयराम यांचा संशयास्पद मृत्यू, घरात सापडला मृतदेह, कपाळावर दिसल्या जखमा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2023 4:12 PM

Singer Vani Jairam : साऊथची प्रसिद्ध गायिका वाणी जयराम यांचे शनिवारी चेन्नईत निधन झाले. त्या ७८ वर्षांच्या होत्या.

साऊथची प्रसिद्ध गायिका वाणी जयराम (Singer Vani Jairam) यांचे शनिवारी चेन्नईत निधन झाले. त्या ७८ वर्षांच्या होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मृतदेह घरात सापडला असून त्याच्या कपाळावर जखमेच्या खुणा असल्याचेही सांगण्यात येत आहे. सध्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. 

वाणी जयराम यांनी नुकतीच इंडस्ट्रीत गायिका म्हणून ५० वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांनी १८ भारतीय भाषांमध्ये १० हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. त्यांचे 'हमको मन की शक्ती देना' हे गाणे आजही लोकांच्या ओठावर आहे. त्यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून यावर्षी त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

वाणी जयराम यांनी वेगवेगळ्या सिनेइंडस्ट्रीतल्या मोठ्या संगीतकारांसोबत काम केले आहे आणि सदाबहार चार्टबस्टर्स दिले आहेत. त्यांनी तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, हिंदी, उर्दू, मराठी, बंगाली, भोजपुरी, तुलू आणि उडिया भाषेत अनेक गाणी गायली होती. त्यांची गाणी देशातच नाही तर जगभरात लोकप्रिय ठरले होते. त्यांना तामिळनाडू, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, केरळ, गुजरात आणि ओडिशा येथून राज्य पुरस्कारही मिळालेत.

वाणी जयराम यांना नुकतीच प्रोफेशनल गायिका म्हणून ५० वर्षे पूर्ण केली होती आणि १०००० हून अधिक गाणी रेकॉर्ड केली होती. त्यांनी एमएस इलैयाराजा, आरडी बर्मन, केव्ही महादेवन, ओपी नय्यर आणि मदन मोहन यांच्यासह इतर प्रसिद्ध संगीतकारांसोबत काम केले होते.वाणी जयराम यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, वाणी यांचे लग्न अशा कुटुंबात झाले होते जिथे संगीताला प्रोत्साहन दिले जात होते. त्यांच्या सासूबाईही गायिका होत्या. त्यांची वहिनी एन. राजम व्हायोलिन वाजवतात आणि बनारस हिंदू विद्यापीठात प्राध्यापकही आहेत. १९६९ मध्ये जयराम यांच्याशी लग्न केल्यानंतर वाणी मुंबईत शिफ्ट झाल्या होत्या. त्या बँकेत नोकरी करायच्या, पण त्यांच्या पतीने त्यांना संगीताच्या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि पाठिंबाही दिला होता.