Salman Khan Security : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याच्याबाबतीत धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने सलमानच्या शूटिंग सेटवर बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे. संशय आल्यानंतर त्याची चौकशी केली असता, 'मी गँगस्टरला सांगू का?' असं तो तरुण म्हणाला. त्यानंतर या संशयिताला चौकशीसाठी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मुंबईच्या झोन-5 मध्ये घडली. संशयिताने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा वापर केल्याचा आरोप आहे. पोलिस त्याची चौकशी करत आहेत. या अज्ञात व्यक्तीने प्रवेश केला तेव्हा सलमान खान शूटिंगच्या ठिकाणी उपस्थित होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. जेव्हा त्याने लॉरेन्स बिश्नोईचं नाव घेतले, तेव्हा क्रूच्या काही लोकांनी त्याला पाहिले. त्यानंतर पोलिसांना याबद्दल माहिती देण्यात आली. सध्या पोलीस त्याची चौकशी करत आहेत.
बॉलिवूडचा दबंग सलमान खानला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने अनेकदा धमक्या देण्यात आल्या आहेत. अलीकडेच अभिनेत्याकडून ५ कोटी रुपयांची खंडणीही मागितली गेली होती. काही दिवसांपूर्वी वांद्रे येथील अभिनेत्याच्या घराबाहेर गोळीबार झाला होता. यामध्ये लॉरेन्स गँगचेही नाव पुढे आले होते. सलमान खानचे जिवलग मित्र बाबा सिद्दीकी यांची काही दिवसांपूर्वीच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तेव्हापासून सलमानच्या सुरक्षेची अधिक जागरूकपणे काळजी घेतली जात आहे.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्याला धमक्या मिळण्याचे प्रमाण वाढले आहे. अलीकडेच सलमान खानला धमकी देऊन ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली गेली होती. धमकीमध्ये म्हटले होते की, 'सलमान खानला जिवंत राहायचे असेल तर त्याने आमच्या मंदिरात जाऊन माफी मागावी अन्यथा ५ कोटी रुपये द्यावेत. त्याने तसे केले नाही तर आम्ही त्याला मारून टाकू. आमची गँग अजूनही सक्रिय आहे. तसेच, काही महिन्यांपूर्वी सलमानच्या मुंबईतील वांद्रे येथील घरावरही गोळीबार झाला होता.