अभिनेता इरफान खान याच्या आठवणीने पत्नी सुतापा व्याकूळ झालीय. इरफानसोबत घालवलेला प्रत्येक क्षण तिला आठवतोय. इरफानच्या निधनाला महिना उलटून गेलाय, पण त्याचे कुटुंब अद्यापही या धक्क्यातून सावरलेले नाही. सुतापाचा तर एक क्षणही इरफानच्या आठवणीशिवाय जात नाही. नुकताच मुंबईत पहिला पाऊस पडला आणि या पहिल्या पावसाने इरफानसोबतच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्यात. सुतापाने सोशल मीडियावर पुन्हा एक भावूक पोस्ट शेअर करत तिने आपल्या भावना व्यक्त केल्यात.
इरफानचे पावसातले काही फोटोही तिने शेअर केले. या फोटोसोबत तिने लिहिले, ‘तुझे आभाऱ़़ मी तुला ऐकू शकते. होय, हे तुझ्याकडून माझ्यासाठी आहे, हे मला ठाऊक आहे. याने माझ्या शरीर आणि आत्म्याला स्पर्श केला. दोन हृदयांच्यामधला हा पाऊस आपल्या दोघांना एकमेकांशी जोडून आहे.’या भावूक पोस्टसोबत तिने शेअर केलेले इरफानचे फोटोही या पोस्टइतकेच बोलके आहेत. यातील एका फोटोत इरफान नदी किनारी झोपलेला दिसतोय. तर दुस-या फोटोमध्ये आकाश आणि आकाशाला मिठी मारू पाहणारी झाडं आहेत. मुंबईतील पहिल्या पावसाचा व्हिडीओही तिने शेअर केला आहे.
काही दिवसांपूर्वी इरफानच्या निधनाला महिना पूर्ण झाला होता. त्यादिवशीही सुतापाने अशीच एक भावूक पोस्ट शेअर केली होती. ‘इथून खूप दूर प्रत्येक चूक वा बरोबरच्या पलीकडे एक रिकामं मैदान आहे. तिथे मी तुला भेटेन. जेव्हा आपला आत्मा या त्या हिरवळीवर शांतपणे झोपलेला असेन आणि हे जग बोलून थकलेलं असेल. काही दिवसांची प्रतीक्षा करत. आपण पुन्हा भेटू, गप्पा मारू,’ असे तिने लिहिले होते.2018 मध्ये इरफानला कॅन्सरचे निदान झाले होते. तेव्हापासून त्याच्यावर उपचार सुरु होते. या काळात सुतापा अगदी सावलीसारखी त्याच्यासोबत होती. लंडनमध्ये जवळजवळ वर्षभर उपचार घेतल्यानंतर इरफान भारतात परतला होता. यानंतर त्याने बॉलिवूडचा ‘अंग्रेजी मीडियम’ हा सिनेमा करत कमबॅक सुद्धा केले होते.