शाहरुख खानचा स्वदेश हा चित्रपट तुम्हाला आठवत असेलच... या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात शाहरुख खान, गायत्री जोशी यांच्या मु्ख्य भूमिका होत्या. या चित्रपटात शाहरुखसोबत झळकलेल्या गायत्रीचा हा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटातील तिच्या सौंदर्याची आणि विशेषतः तिच्या अभिनयाची चांगलीच चर्चा झाली होती.
गायत्रीला तिच्या स्वदेश या पहिल्याच चित्रपटामुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. गायत्री त्यानंतर कोणत्या चित्रपटात झळकेल याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. पण या चित्रपटानंतर गायत्रीने तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. गायत्रीने पहिल्याच चित्रपटानंतर बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला. गायत्री अभिनयक्षेत्रात येण्याआधी एक प्रसिद्ध मॉडेल होती. फेमिना मिस इंडिया स्पर्धेत पहिल्या पाच स्पर्धकांमध्ये तिची वर्णी लागली होती. त्यानंतर 2000 मध्ये तिने एका इंटरनॅशनल कॉम्पिटेशनमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळे तिला मॉडलिंगच्या अनेक ऑफर येत होत्या. त्यानंतर तिने जगजीत सिंग यांच्या म्युझिक व्हिडिओमध्ये देखील काम केले होते. तसेच हंस राज हंस यांच्या झांझरिया या अल्बममध्ये देखील ती झळकली होती. अनेक जाहिरातींमध्ये काम केल्यानंतर तिला चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली. स्वदेश या पहिल्याच चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते.
स्वदेश हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काहीच वर्षांत तिने विकास ऑबेरॉय या व्यवसायिकासोबत लग्न केले. आज ती बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेपासून दूर असून परदेशात आपल्या कुटुंबियांसोबत राहाते. गायत्री आणि विकास यांना दोन मुले असून ती जास्तीत जास्त वेळ मुलांना देते. विकासकडे दहा हजार करोडोहून अधिक संपत्ती असल्याचे म्हटले जाते.
गायत्री आज चित्रपटांमध्ये काम करत नसली तरी बॉलिवूडमधील अनेकांसोबत तिची खूपच चांगली मैत्री आहे. तिला सोनाली बेंद्रे, अक्षय खन्ना, ट्विंकल खन्ना, हृतिक रोशन, सुझान खान यांच्यासोबत अनेकवेळा पाहाण्यात येते. गायत्रीमध्ये आता खूप बदल झाला असून तिला ओळखणे देखील कठीण जाते.