सोशल मीडियावर#BoysLockerRoom हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आला आणि एकच खळबळ उडाली. आता हे काय प्रकरण आहे तर#BoysLockerRoom हे इन्स्टाग्रामवर बनवलेल्या एका अकाऊंटचे नाव आहे. या ग्रूपवरचे शालेय विद्यार्थी अश्लिल चॅट करत होते. धक्कादायक म्हणजे, मुलींचे फोटो टाकून सामूहिक बलात्कार करण्यावर चर्चा सुरु होती. एका ट्विटर युजरने या ग्रूपवरील चॅटचे स्क्रिन शॉट सोशल मीडियावर टाकले आणि सोशल मीडियावर#BoysLockerRoom हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आला. पाठोपाठ या संपूर्ण प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला गेला. आता बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिनेही यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
तिने ट्विटमध्ये लिहिले,‘ कमी वयातच मुलांमध्ये विषारी पुरूषी मानसिकता कशी मूळ धरू लागते, याची कहाणी#BoysLockerRoom मधून सांगितली गेलीय. या ग्रूपमधील मुलं अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण कसे करायचे, त्यांच्यावर सामूहिक बलात्कार कसा करायचा, याची हसत खेळत योजना बनवताहेत. आता पालक आणि शिक्षकांनी या मानसिकतेवर बोलायला हवे. घृणास्पद गुन्हे रोखण्यासाठी केवळ फासावर लटकवणे पुरेसे नाही. पुरूषांना अशा दुष्कर्मासाठी तयार करणा-या मानसिकेतवर आपल्याला प्रहार करावा लागेल.’
अभिनेत्री रिचा चड्ढा हिनेही यावर संताप व्यक्त केला आहे. ‘ही एक सर्वव्यापी समस्या आहे. कारण आपल्या नैतिकवादी देशात आजही लैंगिक शिक्षणावर विनोद केले जातात. शालेय मुलं पॉर्नला सेक्स एज्युकेशन समजून गोंधळली असताना डेटा फ्री आहे. हे प्रचंड धोकादायक आहे,’ असे तिने लिहिलेय.
काय आहे बॉईज लॉकर रूम
बॉईज लॉकर रूम हे एक इन्स्टाग्राम अकाऊंट आहे़ ट्विटरवर सोमवारी सकाळी हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये होता. यावर मुलींचे अश्लिल फोटो शेअर करून आक्षेपार्ह चॅट केले जात होते़ ग्रुपवर काही शालेय विद्यार्थी अश्लील चॅट करत होते. या ग्रुपमध्ये मुलींचे फोटो टाकून सामूहिक बलात्कार करण्याची चर्चा सुरू होती. एका ट्विटर युजरने ग्रुपवरील स्क्रीन शॉट काढून तो सोशल मीडियावर टाकल्यानंतर एकच खळबळ उडाली होती़ बलात्काराची मानसिकता दर्शवणाºया या चॅटची दिल्ली महिला आयोगानेही गंभीर दखल घेतली होती़ तसेच या ग्रूपमधील मुलांना अटक करून त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई करण्याचे मत व्यक्त केले होते़ आता इन्स्टाग्रामवर हा ग्रूप डिअॅक्टिव्हेट करण्यात आला आहे़