Swara Bhasker On Atique Ahmed Murder : उमेश पाल हत्याकांडातील आरोपी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची प्रयागराज मोडिकल कॉलेजजवळ अज्ञात हल्लेखोरांनी गोळी मारून हत्या केली आहे. दोघांचीही वैद्यकीय चाचणी करायची होती. त्यासाठी त्यांना प्रयागराज मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आले होते. जेव्हा या दोघा भावांना मेडिकल कॉलेजच्या इथे आणले तेव्हा दबा धरून बसलेल्या तिंघांनी या दोन्ही भावांवर गोळ्या झाडल्या. अत्यंत जवळून या तिघांनी अतिक आणि अशरफवर गोळया झाडल्या. त्यामुळे या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. मात्र, पोलिसांनी या तिन्ही हल्लेखोरांना अटक केली आहे. या घटनेबाबत सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. आता अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) हिने एक ट्वीट करीत या घटनेचा निषेध केला आहे. माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची हत्या हे अन्य काही नसून अराजकतेचे संकेत असल्याचं तिने म्हटलं आहे.
स्वराचं ट्वीट
“अतिरिक्त न्यायालयीन हत्या किंवा चकमक ही आनंद व्यक्त करण्यासारखी गोष्ट नाही. हे अराजकतेचं लक्षण आहे. राज्य संस्थांची विश्वासार्हता संपुष्टात आली आहे, कारण ते गुन्हेगारांसारखं वागत आहेत किंवा त्यांना सक्षम करीत आहेत हे यातून दिसून येतं. हे कठोर शासन नाही, ही अराजकता आहे,”असं ट्वीट स्वराने केलं आहे. स्वराच्या या ट्वीटवरही अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. नेहमीप्रमाणे या ट्वीटनंतरही स्वरा ट्रोल होतेय. गुप्हेगारांच्या मृत्यूवर किती काळ शोक साजरा कराल मॅडम, अशी कमेंट करत एका युजरने स्वराला ट्रोल केलं आहे. जे झालं ते योग्य झालं, तू मज्जा कर ना, असं एका युजरने म्हटलं आहे. गुंडाच्या मृत्यूवर सहानुभूती दाखवत आहेस, मला आश्चर्य वाटते आहे. लाज बाळग, पब्लिसिटी तर कुठेही मिळेल, असं एका युजरने म्हटलं आहे. २००५ मधील उमेश पाल हत्येप्रकरणी अतिक अहमद आणि अशरफ दोघेही अटकेत होते. अतीकवर विविध प्रकारचे सुमारे १०० गुन्हे दाखल होते. अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांना उमेश पाल हत्या प्रकरणात पोलीस न्यायालयीन सुनावणीसाठी प्रयागराजला घेऊन आले होते. त्याच वेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. अतिक मीडियाच्या प्रश्नांना देत असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि त्यात या दोघांना मृत्यू झाला.