Join us

"तुझा जन्म गाझामध्ये झाला असता तर मी काय केलं असतं?", स्वरा भास्करची भावनिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 3:21 PM

स्वराने तिच्या इन्स्टाग्रामवरुन लेकीबरोबरचा एक फोटो शेअर करत हमास-इस्राइल युद्धाबाबत भावनिक पोस्ट लिहिली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. स्वरा सध्या सिनेसृष्टीपासून लांब असून ती वैयक्तिक आयुष्यात व्यग्र आहे. काही दिवसांपूर्वीच स्वरा आई झाली आहे. तिने गोंडस लेकीला जन्म दिला. स्वरा तिच्या सोशल मीडियावरुन लेकीबरोबरचे गोड क्षण शेअर करताना दिसते. नुकतंच तिने केलेल्या एका पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

स्वराने तिच्या इन्स्टाग्रामवरुन लेकीबरोबरचा एक फोटो शेअर करत हमास-इस्राइल युद्धाबाबत भावनिक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये स्वरा म्हणते, "आपल्या बाळाला तासनतास एकटक पाहण्यासारखं सुख नाही, हे नव्याने आई झालेल्या स्त्रीला ठाऊक असेल. मी त्यांच्यापेक्षा वेगळी नाही. आणि मला हेदेखील माहीत आहे की आपल्या बाळाकडे बघताना जगातील मातांच्या डोक्यात दुर्लक्ष न करता येण्यासारखे विचार येत असतील." 

"माझी लेक गाढ झोपेत असताना तिच्या शांत चेहऱ्याकडे बघत असताना मनात विचार येतो की हिचा जन्म गाझामध्ये झाला असता तर मी तिचं रक्षण कसं केलं असतं? मी प्रार्थना करते की तिला अशा कोणत्याच परिस्थितीचा सामना करावा लागू नये. माझी लेक भाग्य घेऊन जन्माला आली. पण, गाझामधील मुलं कोणता शाप घेऊन जन्मले असतील? ज्यामुळे त्यांना रोज मारलं जात आहे.ज्या कोणत्या देवाला माझी प्रार्थना ऐकू येत आहे, त्याने गाझामधील मुलांचं रक्षण करावं. कारण, हे जग त्यांचं संरक्षण करणार नाही," असं स्वराने पुढे म्हटलं आहे. 

स्वराने समाजवादी पार्टीचा नेता असलेल्या फहाद अहमदबरोबर लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. गेल्या महिन्यात म्हणजेच २३ सप्टेंबरला त्यांना कन्यारत्नाची प्राप्ती झाली. स्वराने लेकीचं नाव राबिया असं ठेवलं आहे. 

टॅग्स :स्वरा भास्करइस्रायल - हमास युद्धसेलिब्रिटी