Join us

स्वरा भास्करच्या पतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेचं तिकीट, अभिनेत्री ट्वीट करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 5:45 PM

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून स्वरा भास्करचा पती निवडणुकीच्या रिंगणात, अभिनेत्री ट्वीट करत मानले आभार

राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकांचा माहौल आहे. २० नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत उमेदवारीसाठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची तिसरी यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये शरद पवार गटाकडून बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करच्या पतीला उमेदवारी देण्यात आली आहे. 

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन तिसऱ्या यादीची घोषणा केली. यामध्ये बहुप्रतिक्षित पिंपरी चिंचवड, परळी आणि अणुशक्तीनगरधील उमेदवार जाहीर झाले आहेत. नवाब मलिक यांचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईतील अणुशक्तीनगरमधून स्वरा भास्करचा पती फहाद अहमद यांना विधानसभेचं तिकीट मिळालं आहे. फहाद अहमदला विधानसभेचं तिकीट मिळाल्यानंतर स्वरा भास्करने ट्वीट केलं आहे. 

स्वरा भास्करने ट्वीट करत शरद पवार, सुप्रिया सुळे यांचे आभार मानले आहेत. "नवीन मुलाला संधी! फहादला ही संधी दिल्याबद्दल शरद पवार साहेब, सुप्रिया सुळे मॅम, अखिलेश यादवजी यांचे आभार. तो तुम्हाला निराश करणार नाही", असं स्वराने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) पक्षाची तिसरी यादी

परळी - राजेसाहेब देशमुख अणुशक्तीनगर - फहाद अहमदचिंचवड - राहुल कलाटेमाजलगाव - मोहन बाजीराव जगताप करंजा - ज्ञायक पटणीहिंगणघाट - अतुल वांदिलेहिंगणा - रमेश बंगभोसरी - अजित गव्हाणेमोहोळ - सिद्धी रमेश कदम

कोण आहे फहद अहमद?

फहद अहमद हे समाजवादी पक्षाचे नेते आहेत. सध्या ते समाजवादीच्या युवा आघाडीचे अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळतात. फहद अहमद यांनी २०२२ मध्ये समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. त्याआधी ते विद्यार्थी संघटनांमध्ये काम करत होते. विद्यार्थ्यांच्या अनेक मागण्यांवर रॅली, आंदोलनात ते सक्रीय सहभाग घेत होते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या फी माफीसाठी केलेले फहद अहमद यांचे  आंदोलन चांगलेच गाजले होते. सीएए कायद्याविरोधात रॅलीमध्येही ते पुढे होते. १६ फेब्रुवारी २०२३ रोजी फहद अहमद यांनी बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करसोबत लग्न केले.  

टॅग्स :स्वरा भास्करमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेस