Join us  

T Rama Rao Passes Away: प्रसिद्ध दिग्दर्शक टी. रामा राव काळाच्या पडद्याआड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 12:13 PM

T Rama Rao Passes Away: अमिताभ बच्चनच्या सुपरहिट ठरलेल्या 'अंधा कानून' या चित्रपटाचे  दिग्दर्शक टी रामा राव यांचं निधन झालं आहे.

अमिताभ बच्चनच्या सुपरहिट ठरलेल्या 'अंधा कानून' या चित्रपटाचे  दिग्दर्शक टी रामा राव यांचं निधन झालं आहे. ते ८४ वर्षांचे होते. गेल्या कित्येक दिवसांपासून ते आजारी होते. अखेर रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली. आज (बुधवार) चेन्नई येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

टी रामा राव गेल्या कित्येक दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली.

कोण होते टी रामाराव?

टी रामा राव हे दाक्षिणात्य कलाविश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक होते. त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं. १९६६ पासून करिअरची सुरुवात करणाऱ्या रामा राव यांनी २००० पर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले.  'जीवन तरंगल', 'अनुराग देवता' आणि 'पचानी कपूरम' हे त्यांचे तेलुगू सिनेमे विशेष गाजले. तर  बॉलिवूडमधील 'अंधा कानून', 'एक ही भूल', 'मुझे इंसाफ चाहिए' आणि 'नाचे मयूरी' या चित्रपटांसाठी त्यांनी काम केलं.

दरम्यान, रामा राव यांचं निधन झाल्यानंतर अभिनेता अनुपम खेर यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. "अनुभवी चित्रपट निर्माते आणि जवळचे मित्र #TRAmaRao जी यांच्या निधनाचं वृत्त ऐकून प्रचंड दु:ख झालं आहे. मी त्यांच्यासोबत 'आखिरी रास्ता' आणि 'संसार' या चित्रपटासाठी काम केलं होतं. जे माझं सौभाग्य होतं. ते प्रेमळ, दयाळू आणि तितकेच समजूतदार होते. त्यांचा सेंस ऑफ ह्यूमर ग्रेट होता. त्यांच्या कुटुंबाच्या दु:खात मी सहभागी आहे", अशी पोस्ट अनुपम खेर यांनी शेअर केली आहे.

टॅग्स :सेलिब्रिटीTollywoodबॉलिवूडअमिताभ बच्चनअनुपम खेर