अभिनेत्री तापसी पन्नू हिने पहिल्यांदाच मीडियासमोर येत, आयकर विभागाच्या कारवाईवर भाष्य केले आहे. गेल्या 3 मार्चला आयकर विभागाने तापसी पन्नूसह दिग्दर्शक अनुराग कश्यप, विकास बहल यांच्या घरावर छापा टाकला होता. दोन दिवस चाललेल्या आयकर विभागाच्या या कारवाईनंतर पहिल्यांदा मीडियासमोर येत तापसी या संपूर्ण घटनाक्रमावर बोलली आहे.एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत तापसीला आयकर विभागाच्या कारवाईबद्दल विचारण्यात आले. यावर मी काहीही चुकीचे केले असेल तर ते समोर येईलच आणि दोषी आढळल्यास मला शिक्षाही होईलच, असे तापसी म्हणाली.
ती म्हणाली, ‘आयकर विभागाचा छापा पडला, त्यांनी प्रक्रियेनुसार सर्व कारवाई केली आणि यादरम्यान मी अधिका-यांना सर्वोतोपरी सहकार्य केले. त्यांना हव्या त्या प्रश्नांची उत्तरे दिलीत. त्यांनी त्यांचे काम केले आणि ते निघून गेलेत. अचानक अशी काही कारवाई होते, तेव्हा क्षणभर गोंधळ उडतो. एका क्षणासाठी मी सुद्धा गोंधळले होते. पण नंतर ही प्रक्रिया आहे आणि कायद्यानुसार ही प्रकिया पार पडत असेल तर सहकार्य करण्यात काहीही गैर नाही, असा विचार करून मी या कारवाईला सामोरे गेले. ’
आयकर विभागाने ही कारवाई का केली मला माहित नाही. कारवाईदरम्यान सहकार्य करणे केवळ एवढेच त्याक्षणी माझ्या हातात होते आणि मी तेच केले. याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता, असेही तापसी म्हणाली.मी काही चुकीचे केले असेल, तर ते बाहेर येईल. मी काहीही लपवलेले नाही. मी माझ्यापरिने अधिका-यांना उत्तरे दिलीत, त्यांना सहकार्य केले. याऊपरही माझ्याविरोधात त्यांना काही सापडले तर मी अगदी आनंदाने मिळेल ती शिक्षा भोगेल. या देशाची नागरिक या नात्याने या देशाचे कायदे पाळणे तुमचे कर्तव्य आहे, असेही तापसी म्हणाली.
तापसीच्या घरी 5 कोटी रूपयांची पावती मिळाली, या मीडिया रिपोर्टवरही तापसी बोलली. ‘आयकर विभागाने माझ्यासकट 22 ठिकाणांवर छापे मारले होते. माझ्या घरात 5 कोटींच्या व्यवहाराची पावती मिळाली,असे आयकर विभागाने स्वत: सांगितलेले नाही. त्यांनी फक्त एक लीडिंग अॅक्ट्रेस म्हटले. माझ्याशिवाय अन्य लोकांच्या घरावरही छापे मारले गेलेत. ती मीच हे कशावरून? मीडियाने ऐकीव माहितीवर हे वृत्त दिले. खरे तर मला 5 कोटी कोणी दिलेत? मला कोण देणार? मी सुद्धा हाच विचार करतेय. माझा पॅरिसमध्ये बंगला आहे, असेही वृत्त दिले गेले. मुळात माझा असा कोणताही बंगला नाही. आयकर विभागाची कारवाई ही प्रक्रियेचा भाग आहे. त्याला सणसणी बनवू नका, असे अर्थमंत्री म्हणाल्या. मलाही तेच सांगावेसे वाटते, ’असेही ती म्हणाली.